कोशीयारी कमिटीच्या अहवालानुसार निवृत्तीवेतन द्या
By admin | Published: March 14, 2016 02:20 AM2016-03-14T02:20:54+5:302016-03-14T02:20:54+5:30
इपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना मिळाणारे निवृत्ती वेतन अत्यल्प असल्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे.
खासदारांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा
वर्धा : इपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना मिळाणारे निवृत्ती वेतन अत्यल्प असल्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यांना सध्या ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्यात येते. यात वाढ करण्याची शिफारस कोशीयारी समितीने केली आहे. या समितीनुसार ३ हजार रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी ईपीएस-९५ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांना केली.
खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत ईपीएस-९५ च्या पेन्शन प्रश्नावर संसदेमध्ये केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांशी चर्चा झाली. यावेळी ईपीएस-९५ चे राष्ट्रीय सचिव, पी.एन. पांडे पुलगाव, अरुण देवगिरकर उपस्थित होते. यावेळी पुंडलिक पांडे यांनी वाढीव पेन्शन देण्याची मागणी केली. सध्या ५०० ते २००० रुपयांपर्यंत पेन्शन दिली जात असल्याची माहिती मंत्र्यांना दिली. देशात कैद्यांवर केंद्र शासन दररोज ८८ रुपये खर्च करते व देशाला महासत्ता बनविण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या पेन्शनरला म्हणजे दोघा नवरा-बायकोला दर दिवसाला ३३ रुपये दिले जातात, ही शोकांतिका असल्याचे नमूद केले. डोंगरे यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांना २०१३ पासून राज्यसभेत क्र. १४७ कोशीयारी कमिटीने अहवाल सादर केला. यावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी विस्तृत माहिती घेत एक महिन्यांत बैठक लावण्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे अलाहाबाद येथे सभा असल्याने उपस्थित नव्हते.(प्रतिनिधी)