लोकअदालतीने वेळ, पैसा वाचून मानसिक समाधान मिळते
By admin | Published: July 12, 2017 02:08 AM2017-07-12T02:08:14+5:302017-07-12T02:08:14+5:30
राष्ट्रीय लोक अदालतीमुळे आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढता येतात. हा मार्ग पत्करल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत
संध्या रायकर : ११८ प्रकरणे निकाली, लोक अदालतीचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय लोक अदालतीमुळे आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढता येतात. हा मार्ग पत्करल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मानसिक समाधान मिळते, असे मत जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष संध्या रायकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालय सभागृहात राष्ट्रीय लोक अदालतीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर सर्व जिल्हा सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ व कनिष्ठ स्तर जिल्हा, शासकीय अधिवक्ता जी.व्ही. तकवाले, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष जी.ए. जाचक, न्यायालय व्यवस्थापक मिर्झा, विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव वि.आ. पाटील आदी उपस्थित होते.
रायकर पूढे म्हणाल्या की, न्यायालयात प्रलंबित व वाद दाखलपूर्व प्रकरणांचा अधिकाधिक प्रमाणात निपटारा करणे राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे. या अदालतीत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमुळे दोन तडा गेलेल्या मनांना जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पारिवारिक व सामाजिक स्रेह वाढतो. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
लोक अदालतीकरिता जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय मिळून एकूण १४ पॅनल नेमण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश आणि दोन पॅनल सदस्यांचा समावेश होता. यात एक अधिवक्ता आणि एका समाजसेवकाचाही समावेश करण्यात आला आहे. संचालन आशिष अयाचित यांनी केले. कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी, सर्व न्यायीक अधिकारी, अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते, पक्षकार, वित्तीय संस्थांचे सदस्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
तडजोडीतून ९३.५० लाखांचे शुल्क वसूलवर्धा व तालुका न्यायालयातील दिवाणी व फौजदारी खटले आणि कलम १३८ एन.आय. अॅक्ट प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, ट्रान्सपोर्ट यांचे वाद, दाखलपूर्व प्रकरणे असे ४३ आणि प्रलंबित ७५ अशी एकूण ११८ प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांच्या तडजोडीचे मूल्य ९३ लाख ५० हजार ७९४ रुपये इतके आहे.