नदी पात्रातून होते ग्रामस्थांची ये-जा
By admin | Published: June 13, 2015 02:13 AM2015-06-13T02:13:13+5:302015-06-13T02:14:08+5:30
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात.
नांद्रा-आष्टावासीयांची व्यथा : बोर नदीवर पुलाची प्रतीक्षा कधी संपणार
सेवाग्राम : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात. नदीच्या पात्रातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागल्यावर या बाबीचा प्रत्यय येतो. गत कित्येक वर्षांपासून लगतच्या आष्टा, नांद्रा या गावांतील नागरिकांना बोर नदीच्या पात्रातून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. बोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ही समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली; पण त्याकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते.
हमदापूरपासून चार किमी अंतरावर आष्टा व नांद्रा ही दोन गावे आहे. या दोन गावाच्या मधून बोर नदी वाहते. नदीच्या काठावर गावे वसली असून जमीनही सुपिक आहे; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन्ही गावांना पावसाळ्यात मरणयातना सहन कराव्या लागतात. यात सर्वाधिक कष्ट नांद्रा येथील नागरिकांना सोसावे लागत आहे. नदीवर रपटा असून पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत असते. यामुळे त्या रपट्याचा उपयोग होत नाही. नदीवरील आष्टा गावाकडे असलेला रपटा पूर्णत: फुटला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर दुरूस्ती केली जात आहे; पण कायम तोडगा काढण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यात आष्टा गावापर्यंत बस पोहोचत होत्या; पण रपटा फुटल्याने त्याही बंद झाल्या आहेत.
दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हमदापूर येथे जावे लागते; पण बसेस व अन्य वाहने उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. तास दोन तास पाऊस झाला तरी नदीचे पात्र वाहते होते. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अनेकदा नातलगांकडे राहण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पुलाची मागणी करीत आहे; पण अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. ग्रामीण भागात रस्त्यांनी शहरांशी जोडला जात असताना पुलांच्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नदीच्या पात्रातून केवळ रपटा बांधून ग्रामस्थांना नदी पात्रातून प्रवास करण्यास प्रशासन बाध्य करीत असल्याचे दिसते. या असुविधांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह संबधित विभागाने याकडे लक्ष देत आष्टा, नांद्रा या गावाची पुलाची मागणी निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
ग्रामपंचायतींचे ठराव देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांना रहदारीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशा मागणीचे ठराव आष्टा आणि नांद्रा ग्रामपंचयातींनी लोकप्रतिनिधींना सादर केले होते. शिवाय पूल बांधकामाचा प्रस्तावही ग्रामपंचायतीद्वारे सादर करण्यात आला होता; पण अद्यापही त्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. पुन्हा पावसाळा सुरू झाल्याने नदीच्या काठावर वसलेल्या दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याचा धोका तर आहेच; पण पावसाळ्यात रहदारीही धोक्यात येत असल्याने शेतीची तसेच अन्य कामे खोळंबतात. दरवर्षी घडणाऱ्या या प्रकारामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनालाही अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप बोर नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही. सध्या रपट्याची दुरवस्था झाल्याने आष्टा गावापर्यंतच्या बसेसही बंद आहेत. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.