समीरच्या समर्थनार्थ जनसमुदाय रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:21 PM2017-12-20T23:21:11+5:302017-12-20T23:21:50+5:30

समीर मेटांगळे याची शुक्रवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी अद्याप दोघे मोकाटच आहेत.

 People in support of Sameer on the road | समीरच्या समर्थनार्थ जनसमुदाय रस्त्यावर

समीरच्या समर्थनार्थ जनसमुदाय रस्त्यावर

Next
ठळक मुद्देप्रोटेस्ट मार्चद्वारे पोलीस अधीक्षकांना निवेदन : पोलिसांचा चोख बंदोबस्त, योग्य तपासासाठी जनाक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समीर मेटांगळे याची शुक्रवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी अद्याप दोघे मोकाटच आहेत. त्या दोघांना त्वरित बेड्या ठोकण्यात याव्यात आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून प्रोटेस्ट मार्च काढण्यात आला. या प्रोटेस्ट मार्चमध्ये मृतक समीरच्या आई-वडिलांसह वर्धेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रोटेस्ट मार्चमध्ये सहभागी होण्याकरिता सकाळी १० वाजतापासून शिवाजी चौकात नागरिकांसह तरुणांनी गर्दी करण्यास सुरूवात केली होती. शिवाजी चौक येथून सकाळी ११ वाजता निघालेल्या या मार्चने बढे चौक, इतवारा चौक असे मार्गक्रमण करीत सकाळी ११.३५ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. मार्चमध्ये सहभागी तरुणांसह नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्र्रवेशद्वारावर पोलिसांनी अडविले. यानंतर शिष्टमंडळात सहभागी मृतक समीरच्या आई-वडिलांसह जखमींच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची त्यांच्या दालनात दुपारी १२ वाजता भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जखमी तरुणांची बाजू तसेच आंदोलनात सहभागी नागरिकांची काय मागणी आहे, याची माहिती मंगेश चांदुरकर यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी प्रकरणाची सध्या योग्य दिशेने चौकशी सुरू आहे. येत्या २४ तासांत योग्य निर्णय घेत प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या हत्या प्रकरणातून काहींना वगळण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत होते. यामुळे जनाक्रोष वाढला असून पोलिसांनी योग्य तपास करावी, अशी मागणी होत आहे.
तपासाअंतीच होणार दोषारोपपत्र दाखल
आरोपी विभव गुप्ता याच्या बयानावरून मृतक समीरला रुग्णालयात नेणाºया पाच जणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभवने सेवाग्राम रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष सदर बयान नोंदविले आहे. सध्या गुन्हा नोंदविला असला तरी विभवच्या बयानात काय सत्यता आहे, याची चौकशी करूनच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिली. विश्वास ठेवा, न्याय मिळेल, असे म्हणत मृतक व जखमींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अखेर प्रथम व्होराला अटक, कलमांत वाढ
शहरातील प्रसिद्ध औषधी विक्रेते तथा राधा मेडिकल स्टोअर्सचे मालक मनोज व्होरा यांचे सुपूत्र प्रथमेश व्होरा याला बुधवारी दुपारी ४.३० वाजता अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. घटनेच्या दिवसापासून प्रथम व्होरा व एका अल्पवयीनाला वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांकडून होत होता. प्रथमची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात प्रारंभी रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७ व हत्यार अ‍ॅक्टच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता नवीन तपासी अधिकाऱ्यांनी कलम ३४ तथा २०१ वाढविली आहे. आरोपीला विचारपूस, प्रथम खबर, फिर्यादीचा पुरवणी जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांचा जबाब तथा पुराव्यांवरून प्रथम व्होरा याला अटक केली आहे. पूढील तपास पोलीस उपअधीक्षक दिलीप सावंत करीत असून त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे व त्यांचे पथक सहकार्य करीत आहे.
अधिकाऱ्यांचीही चौकशी
मेटांगळे हत्या प्रकरणाचा तपास वळता करण्यात आला. यापूर्वी तपास करणाºया अधिकाºयांवर आता तपासात हयगय केल्याचे आरोप होत आहे. यामुळे पूर्वीच्या तपास अधिकाऱ्यांनी कुठल्या दबावाला बळी पडून वा कोणत्या अधिकाऱ्यांच्या दबावात येत काय त्रूटी केल्या, याची चौकशी दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. चौकशीत जो दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
आपल्याकडून न्यायाची अपेक्षा
पोलीस अधीक्षकांच्या दालनात झालेल्या चर्चेमध्ये मृत समीरची आई श्यामली मेटांगळे यांनी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना ‘मी मुलगा गमवला; पण आता आपल्याकडूनच न्यायाची अपेक्षा आहे’ अशी आर्तता प्रकट केली. याप्रसंगी पोलीस अधीक्षकांना योग्य कारवाईसाठी साकडे घालण्यात आले.
मार्चद्वारे या मागण्या धरल्या रेटून
मृतक समीरला चाकू भोसकणारा आरोपी विभव गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे; पण ज्या दोन मित्राच्या साह्याने आरोपी विभव याने घटनास्थळावरून पळ काढला, त्या दोघांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. समीर मेटांगळे हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या शहरातील औषधी विक्रेत्याचा मुलगा प्रथमेश व्होरा व एका अल्पवयीनाला २४ तासांत अटक करण्यात यावी.
सदर प्रकरणात सुरूवातीचे तपास अधिकारी व एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका प्रारंभापासूनच संयशास्पद आहे. त्यांच्याकडून मृतक समीरचे मित्र असलेल्या जखमींवरही दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाºयांवरही निलंबनाची कारवाई करावी.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मृतक समीरला रुग्णालयात दाखल करणाºया पाच तरुणांविरुद्ध आरोपी विभव गुप्ता याच्या बयानावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जखमींचाही समावेश असून आरोपी विभवच्या बयानावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाचही तरूणांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.
समीर मेटांगळे हत्या प्रकरणातील आरोपींना विनाविलंब कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.
या प्रकरणात सुरूवातीपासून स्थानिक पोलिसांचा तपास संशयास्पद आहे. परिणामी, स्थानिक पोलिसांच्या तपासावर कितपत विश्वास ठेवावा. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, या हेतूने हा तपास सीबीआयकडे वळता करण्यात यावा.

Web Title:  People in support of Sameer on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून