आदिवासीबहुल गावात कोरोना लसीकरणाची टक्केवारी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 PM2021-06-01T16:05:26+5:302021-06-01T16:07:24+5:30
Wardha news प्रत्येक गाव खेड्यात आरोग्य विभागामार्फत लसीचा पुरवठाही सुरू आहे. मात्र, अति दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत असून लसीकरणाला भीत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली. प्रत्येक गाव खेड्यात आरोग्य विभागामार्फत लसीचा पुरवठाही सुरू आहे. मात्र, अति दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत असून लसीकरणाला भीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून अद्यापही वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
रोहणा आरोग्य केंद्राअंतर्गत पाचोड येथे उप आरोग्य केंद्र आहे. या केंद्राला लागूनच पाचोड, टेंभरी, परसोडी अशी तीन गावे आहेत. तसेच खैरी येंडे, खैरी गुरव, कृष्णापूर, चिकटी ही आदिवासी दुर्गम भागातील गावे आहेत. मात्र, कृष्णापूर, खैरी आणि चिक्की ही तीन गावे मिळून केवळ तीन लोकांनीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असल्याची माहिती आहे.
या उपकेंद्रात येणाऱ्या गावातील ३० लोकांना कोरोनाची लागण होऊनही लसीकरण करण्यात या भागातील नागरिक घाबरत आहेत.
पाचोड येथे फक्त ५५ लोकांनी कोविड लस घेतलेली आहे. या गावात आतापर्यंत १६ लोकांना कोरोना झाला आहे. टेंभरी, परसोडी ही दोन मोठी गाव मिळून ११४ लोकांनी लसीकरण करून घेतले. तर १० बाधित रुग्ण आढळून आले होते. खैरी कृष्णापूर या दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास एक हजारावर असून तीन लोकांनी लसीकरण केले तर तीन लोकांना कोरोनाची लागण झाली. एकबुर्जी येथेही पंधराच नागरिकांनी कोरोना लस घेतली असून एकाला कोरोनाची लागण झाली.
विशेष बाब चिकटी या दुर्गम भागातील गावात एकाही नागरिकाने लस घेतली नसून येथे एकही कोरोना रुग्ण नाही. अनेक गावांतील नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित असून अनेक ग्रामीण भागातील नागरिक आजही लसीकरण करण्यास भीत आहेत.
आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक गावात भेट देऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगत असले तरी नागरिक लसीकरणाला भीत आहेत. अतिदुर्गम भागातील अनेक गावांत कोरोना हा आजार पोहोचला नसला तरी नागरिकांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.