आॅनलाईन फसवणाऱ्याला गुजरात येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:23 PM2018-05-15T22:23:39+5:302018-05-15T22:23:39+5:30
बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. धर्मेंदकुमार राजेंद्रप्रसाद वर्मा (२५) रा. पालेगंग, पटना (बिहार) ह.मु. उमरगाव, गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, प्रशांत कवडुजी भोयर (२९) रा. वासी (कोरा) ता. समुद्रपूर हा हासनराईजर कन्टेनर कंपनी, डेहरी गाव (गुजरात) येथे नोकरीला आहे. त्याचे हिंगणघाट येथील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्याच्या खात्यातून १५ मार्च २०१८ ते १६ मार्च २०१८ दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने आॅनलाईन पद्धतीने २ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन केल्याचे निदर्शनास आले. यावरून त्याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ४२०, सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सुधारित सन (२००८) अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस स्टेशन तर्फे याचा समांतर तपास करण्यात आला. तपासादरम्यान माहिती मिळाली की, प्रशांत भोयर याचे मोबाईल सीम घटना काळात बंद झाले. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मॅसेज बंद होते. यामुळे तो या फसवणुकीसंबंधी अनभिज्ञ राहिला. दोन-तीन दिवसांनंतर त्याने बंद झालेले सीम पुन्हा सुरू केले असता सदर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आला.
या माहितीवरून सदर ट्रान्झॅक्शन हे उमरगाव, गुजरात म्हणजेच फिर्यादीचे राहते जागेवरूनच झाल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपीने प्रशांतचे सीम कार्ड चोरून त्याचा वापर करून सदर ट्रान्झॅक्शन केल्याचे तपासात उघड झाले. यावरून तात्काळ पोलीस पथक उमरगाव गुजरात येथे धडकले. मोबाईल धारक धर्मेंदकुमार वर्मा नामक व्यक्तीला चौकशीकरिता ताब्यात घेतले. त्याला अधिक विचारपूस केली असता तो प्रशांतच्या रूमवर राहत असून त्याच्याच कंपनीमध्ये काम करीत असल्याचे समोर आले. त्याला प्रशांतने आपले एटीएम कार्ड काही कामाकरिता दिले असता त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. धर्मेद्रकुमार याने सदर रक्कम आॅनलाईन पद्धतीने त्याच्या बिहारमधील अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केल्याचे कळले. हा प्रकार केल्यानंतर काही काळानंतरच त्याने कंपनी सोडण्याकरिता अर्ज दिलेला असून गुजरातमधून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच वर्धा पोलिसांनी त्याला अटक केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या निर्देशाने सहायक फौजदार अनिल वर्मा, विजय वाजपेयी, राजेंद्र हाडके, कुलदीप टांकसाळे, अमोल आलवाडकर, प्रफुल हेडाऊ यांनी केली.
मित्रानेच दिला दगा
लग्नाचे काम असल्याने प्रशांत याने त्याचे एटीएम त्याच्या मित्राकडे विश्वासने दिले. मात्र मित्राने त्याच्या विश्वासाला दगा देत फसवणूक केल्याचा प्रकार येथे घडला.