coronavirus; हरियाणातून वर्ध्यात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:50 PM2020-06-12T12:50:49+5:302020-06-12T12:51:10+5:30
दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
दत्तपुर येथे महारोगी सेवा संस्थाच्या परिसरात सोलर एनर्जीवर आधारित प्रकल्प उभारणीसाठी 5 जूनला गुडगाव येथून 65 वर्षीय पुरुष कारने वर्धेत आलेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे. त्यांच्याकडे कोणताही प्रवेश पास नसल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यांना 6 जूनला दत्तपुर येथील विश्राम गृहात विलगीकरण करण्यात आले. दरम्यान 8 जूनला त्यांना पाठदुखीचा त्रास झाल्याने सामान्य रुग्णालायत तपासणी केली व औषधोपचार करून परत पाठविण्यात आले.
त्यांना खोकल्याचा त्रास व्हायला लागल्यावर 9 जूनला सामान्य रुग्णालयात त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता. काल रात्री त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे 1 वाजता रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथे भरती करण्यात आले. आज त्यांचा स्त्राव तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.