अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला
By महेश सायखेडे | Published: February 21, 2023 08:11 PM2023-02-21T20:11:38+5:302023-02-21T20:11:50+5:30
वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
वर्धा: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिला. नितीन ओमदास जवादे (३५) रा. कुटकी (तळोदी), ता. सेल असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी नितीन जवादे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ३४१ अंतर्गत एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्यांचा कारावास, भांदविच्या कलम ५०६ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भर रस्त्यात केला होता विनयभंग
संबंधित प्रकरणातील पीडिता ही १९ ऑगस्ट २०१९ ला शाळेतून घरी सायकलने जात होती. दरम्यान, दुचाकीने आलेल्या आरोपीने तिला वाटेत अडवून तू माझ्यासोबत चल, असा तगादा लावत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने आरोपीच्या तावडीतून स्वत: ची सुटका करून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली होती.
पाच साक्षीदारांची तपासली साक्ष
संबंधित प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सुजित पांडव व देवेंद्र कडू यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.