पेट्रोलपंप हटाव समितीने दाखविले मंत्र्यांना काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:20+5:30
आंदोलनकर्त्यांकडून मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील काळे झेंडे जप्त केले. पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यासाठी आता केवळ काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास थेट तोंडालाच काळे फासू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस वेल्फेअरच्यावतीने सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पेट्रोलपंप उभारला जात आहे. या पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यात यावी या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सध्या साखळी उपोषण सुरू आहे. असे असतानाही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सेवाग्राम मार्गावरील इंदिरा गांधी उड्डाण पुलावर पेट्रोलपंप हटाव समितीच्यावतीने निषेध आंदोलन करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आ. रणजित कांबळे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. आंदोलनकर्त्यांकडून मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील काळे झेंडे जप्त केले. पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यासाठी आता केवळ काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास थेट तोंडालाच काळे फासू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात जि.प.चे समाजकल्याण विभागाचे सभापती विजय आगलावे, पेट्रोलपंप हटाव कृती समितीचे महेंद्र मुनेश्वर, अतुल दिवे, शारदा झामरे, प्रकाश पाटील, दीपक भगत, सुनील वनकर, समाधान पाटील, आशिष सोनटक्के, स्मिता नगराळे, रत्नमाला साखरे, वसंत भगत, नीरज गुजर, विशाल रामटेके, किशोर खैरकार, मनोज कांबळे, अरविंद निकोसे, विशाल नगराळे आदी सहभागी झाले होेते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.