पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 05:37 PM2021-11-24T17:37:54+5:302021-11-24T17:40:46+5:30

एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली. धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

Petrol tanker hits railway crossing; Central Railway up line disrupted | पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत

पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत

Next
ठळक मुद्देमालगाडी ३ तास उभी करावी लागली वर्धा रेल्वे स्थानकावर

वर्धा : चिकणी (जामणी) नजीकच्या निमगाव शिवारात नायरा कंपनीला पेट्रोल डेपो आहे. याच पेट्रोल डेपाेतून संपूर्ण विदर्भासह छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात असून या डेपोत जाणाऱ्या एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली.

धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नाअंती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीला वर्धा रेल्वे स्थानकावरच तीन तास थांबवावे लागले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या टँकर चालकाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच अपघातग्रस्त टँकरही जप्त करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आंबोडा चौकी येथील रेल्वे फाटक अर्धवट उघडताच एमएच ३४- बीजी ५७६८ क्रमांकाचा टँकर चालक विठ्ठल मोरे याने त्याच्या ताब्यातील टँकर नायरा कंपनीत नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान टँकरचा काही भाग रेल्वे फाटकाच्या लोखंडी खांबाला धडकला. अशातच हा लोखंडी खांब तुटून थेट रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या प्रवाहित विद्युत तारेवर पडला. त्यामुळे विद्युत वाहिनी तुटल्याने रेल्वे विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.

रेल्वे विभागाला ७५ हजारांचा फटका

मुख्य विद्युत वाहिनी तुटल्याची माहिती मिळताच वर्धा रेल्वे स्थानकाचे प्रबंधक डी. एस. ठाकूर, आर. सी. भारती तसेच ५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दुरुस्तीचे काम सुरू केले. तब्बल तीन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास यश आले आहे. असे असले तरी या घटनेमुळे रेल्वे विभागाला ७५ हजारांहून अधिकचा फटका बसला आहे.

३ तासांनंतर सुरळीत झाली रेल्वे वाहतूक

तब्बल ३ तासानंतर नागपूर-मुंबई मध्यरेल्वेच्या अपलाईनचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे दुपारी १.३० ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत नागपूरकडून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

नायराच्या अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाहीच

या प्रकरणी नायरा कंपनी प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी नायराचे अधिकारी जाधव यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नायरा कंपनी जवळील अपघातामुळे नागपूर-मुंबई या मध्य रेल्वेची अप लाईन प्रभावित झाली होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या एका मालगाडीला वर्धा रेल्वे स्थानकावरच थांबवावे लागले. दुपारी ४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर मालगाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

- डी. एस. ठाकूर, प्रबंधक, रेल्वे स्थानक, वर्धा

Web Title: Petrol tanker hits railway crossing; Central Railway up line disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.