पुलगाव बॅरेज पूर्ण झाल्यास सुटेल पाणीप्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:18 PM2019-05-22T21:18:36+5:302019-05-22T21:19:44+5:30
निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास नदीकाठच्या १३ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आॅक्टोबर २००९ मध्ये या ९६ कोटींच्या पुलगाव बॅरेजचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मे २०१० मध्ये सुरू होऊन तीन-चार वर्षांत या बॅरेजचे बांधकाम पूर्ण होईल, असे अपेक्षीत होते. परंतु शासनाच्या लालफीतशाहीत व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे काही काळ हे काम रखडले. ९६ कोटींचा पुलगाव बॅरेज तीनशे कोटीवर पोहोचला. पुढे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे कामाची गती मंदावली. अखेर केंद्रशासनाने निम्न वर्धा प्रकल्पाचे काम हाती घेतले. आज हे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ १० टक्के बांधकाम होणे आहे.
या पुलगाव बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. एवढा आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी आहे. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तर १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १० बाय ६ फुटांचे १५ दरवाजे आहेत.
बॅरेजचे काम पूर्ण झाल्यावर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भांडार व परिसरातील पिंपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरूळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर इत्यादी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याशिवाय या बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे शेतीही ओलिताखाली येणार आहे.
वाळूअभावी काम रेंगाळले
केवळ १० टक्के बांधकाम बाकी असून तेही काम रेती अभावी रेंगाळल्याची चर्चा आहे. या नदीच्या रेती घाटावरून शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा होत असून कित्येक ट्रक रेती जप्त करण्यात आली आहे. शासनाने या बॅरेजच्या कामासाठी रेती उपलब्ध करून दिल्यास बॅरेजचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.