प्रशासकीय इमारतीत मद्यशौकीनांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:26 PM2017-12-25T23:26:21+5:302017-12-25T23:26:31+5:30
सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे. या इमारतील असलेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच या इमारतीत काय उद्योग चालतात याचा परिचय देत आहे.
विशेष म्हणजे, याच प्रशासकीय इमारतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. असे असताना येथे असा प्रकार सुरू आहे. या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी उप प्रादेशिक परिवहन विभागाची आहे. आणि याच विभागाचे कर्मचारी या प्रकारात सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. येथील काही अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या आशिर्वादाने काम करणारे दलाल यांच्यात येथे रात्रीला पार्टी रंगत असल्याची चर्चा आहे.
या प्रशासकीय इमारतीत सुमारे १५ शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करणारे कर्मचारी रात्री तर सोडाच भरदिवसाच येथे दारू रिचवित असल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही वर्षांपूर्वी याच इमारतीतील मत्स्य विभागात झालेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली होती. यानंतर इमारतीत सुरू असलेल्या प्रकारावर आळा बसेल असे वाटले होते, मात्र तसे होताना दिसत नाही. येथे दिवसागणिक हा प्रकार वाढत आहे. यामुळे इमारतीची जबाबदारी असलेल्या उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहेत.
इमारतीत एकूण १५ कार्यालये
या इमारतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार न्यायालय, जिल्हा भुमीअभिलेख कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग यासह सुमारे १५ विविध कार्यालये आहेत. शिवाय याच कार्यालयाच्या परिसरात दारूच्या शिश्या आढळून येत असल्याने जिल्ह्यात दारूबंदीची स्थिती लक्षात आल्याशिवाय राहत नाही. यामुळे या भागात लक्ष देत कारवाई गरजेची आहे.