तूर घसरली, चणा चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 01:35 AM2016-09-28T01:35:58+5:302016-09-28T01:35:58+5:30
शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून
सप्टेंबर अखेरीस तूर सरासरी ६,७४० तर चण्याच्या भावात ८,५०० रुपयांपर्यंत वाढ
रूपेश खैरी वर्धा
शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून त्या तुलनेत चण्याचे दर चढत असल्याचे दिसत आहे. आज कधी नव्हे तेवढे चण्याचे दर चढले आहे. चणा सरसरी ८ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात चण्याचा पेरा करणाऱ्यांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसत आहे.
गत हंगामात तूर १३ हजार रुपयांवर पोहोचली होती. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यात तूर ७ हजार रुपयांवरच आहे. सध्या असलेले दर वाढतीलच असे संकेतही बाजारात नाही. गत सहा महिन्यात तुरीच्या दरांचा विचार केल्यास ते पडतच असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धा बाजार समितीत ८ हजार ६०० रुपयांनी खरेदी झालेली तूर आज सात हजार रुपयांवर आली आहे. हिच अवस्था जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून नाव असलेल्या हिंगणघाट समितीची आहे. येथे ७ हजार ६९० रुपयांपासून सुरू झालेली खरेदी आज ७ हजार २५ रुपयांवर आली आहे.
तुरीच्या तुलनेत महिन्याकाठी मात्र चन्याच्या दरात वाढच होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात ४ हजार ६०० रुपयांपासून खरेदी सुरू झालेला चना आज वाढत जावून ८ हजार ५५० रुपयांवर स्थिरावला आहे. हिच स्थिती हिंगणघाट बाजार समितीची आहे. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे चणा होता त्यांनी हंगाम साधल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. गत वर्षी तुरीच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ होता. यंदा तो लाभ चण्याचे उत्पन्न घेण्याऱ्या शेतकऱ्यांना झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात तुरीच्या तुलनेत चण्याचे पीक घेणारे शेतकरी कमी असल्याने वाढीव भावाचा जिल्ह्याला विशेष लाभ झाला नसल्याचे बोलले जात आहे. वर्धा बाजार समितीचा विचार केल्यास गत सहा महिन्यात एकूण १६ हजार १५० क्विंटल चण्याची आवक झाली आहे तर तुरीची २१ हजार १२७ क्विंटल झाली आहे.
गरजू नाही तर साठेबाज शेतकऱ्यांनाच दरवाढीचा लाभ
गत सहा महिन्यांपासून चन्याचे दर वाढतच आहे. याचा ल् ााभ गरजवंत शेतकऱ्यांना होण्याऐवजी साठेबाज शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे दिसून आले आहे. रबीत घेतलेला चना विकून शेतकऱ्यांनी नवा खरीप साजरा केला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडील चना ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांत विकल्या गेला. आज शेतकऱ्यांकडे चना नसताना बाजारात ८ हजार ५०० रुपये दर आहे. याचा लाभ शेतकऱ्यांन नाही तर साठेबाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होत आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या घरी तुरी पडून
गत हंगामात तुरीचे दर वाढले होते. यंदाही तुरीचे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यांना होता. यामुळे काही सधन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तुरीचा साठा करून ठेवला होता. दर वाढताच तूर विकण्याचा त्यांचा मानस होता. मात्र यंदाच्या हंगामात तुरीचे दर वाढण्याऐवजी ते घसरत असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धेत ८ हजार ६०० तर हिंगणघाट बाजार समीतीत ७ हजार ६९० रुपये असलेले दर सप्टेंबर अखेर वर्धा बाजार समितीत ६ हजार ७४० तर हिंगणघाट येथे ६ हजार ३८३ रुपयांचवर गडगडले आहे.
येत्या महिन्यात दिवाळसण आहे. या काळात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघते. त्या काळात सोयाबीनला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र ती दर वर्षीच फोल ठरत आली आहे. यंदाही तसेच होण्याची शक्यता आहे.