या.. खड्डा करा, रोपटे लावा.. संगोपन आम्ही करू
By admin | Published: July 8, 2017 12:18 AM2017-07-08T00:18:44+5:302017-07-08T00:18:44+5:30
या.. कुदळ पावडे घ्या, खड्डा करा आणि रोपटे लावा. तुम्ही लावलेल्या रोपट्याचे वृक्ष आम्ही करू. तुम्हाला वेळ
तीन तासांत २००० रोपट्यांची लागवड : गांधी सिटी ‘ग्रीन सिटी’ करण्याचा वैद्यकीय जनजागृती मंचाचा मानस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : या.. कुदळ पावडे घ्या, खड्डा करा आणि रोपटे लावा. तुम्ही लावलेल्या रोपट्याचे वृक्ष आम्ही करू. तुम्हाला वेळ भेटल्यास तुम्ही लावलेल्या रोपट्याला पाणी देण्याकरिता या. असे म्हणत येथील ओसाड आणि खडकाळ हनुमान टेकडीवर गांधी सिटीला ‘ग्रीन सिटी’ करण्याचा मानस येथील वैद्यकीय जनजागृती मंच पूर्णत्त्वास नेत आहे. त्यांचा हा मानस पूर्ण करण्याकरिता वर्धेकरांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हनुमान टेकडीवर राबविण्यात येत असलेल्या या उपकमात वर्धेकरांच्या मदतीने गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ६ ते ९ या तीन तासांच्या काळात तब्बल ४ हजार ५०० रोपटी लावण्यात आली आहेत. या टेकडीवर आठ हजार रोपटी लावण्याचा त्यांचा मानस होता. या जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्याकरिता शिल्लक राहिलेले रोपटे मंचाच्यावतीने लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन तासात २ हजार रोपटी लावण्याचा हा विक्रमच व्हीजेएमने येथे केल्याचे दिसते. कदाचित एवढी झाडे लावण्याची ही पहिलीच वेळ असावी असा अंदाज सर्वांकडून वर्तविण्यात येत आहे. खडकाळ आणि उतार भागाच्या टेकडीवर वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण करण्याच्या या प्रयत्नात वर्धेतील विविध सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या आहेत.
यात हिंदी विश्व विद्यालय, राष्ट्रीय सामाजिक विद्यालय, गॅमन इंडिया कंपनीचे मेंबर्स, लोकविद्यालयाचे विद्यार्थी, गांधी सिटी पब्लिक स्कूल, बहार नेचर फाउंडेशन, एबीसी मेंबर्स, हेल्पिंग हार्ट मेंबर्स, ग्रीन आर्मी मेंबर्स आणि व्हीजेएमच्या सर्व सदस्यांनी वृक्षारोपण आणि मार्गदर्शन केले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले.
जिल्ह्यात १० लक्ष वृक्ष लागवड
वर्धा- चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत शुक्रवारी दुपारपर्यंत १० लक्ष ३७ हजार ३२९ रोपाची लागवड करण्यात आली आहे. यात वनविभाग ५ लक्ष ६४ हजार ८७७ , सामाजिक वनीकरण १ लक्ष १३ हजार ३१२ आणि इतर विभागांनी ३ लक्ष ५९ हजार १४० वृक्ष लागवड केलेली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था, वैद्यकीय संस्था, व वैयक्तिकरित्या नागरिकांनी वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग नोंदविला.
जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण झाले असून आता स्वत: घेतलेले १२ लाख ८० हजारांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याने ६ लाख ३९ हजाराचे उद्दिष्ट पार केले. आज दुपारपर्यंत १० लाख ३७ हजार वृक्षलागवड केली आहे. वृक्ष लागवड करणाऱ्या प्रत्येकाने आता वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारुन वृक्ष लागवड मोहीम यथार्थ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.