उबदा ते मांगली रस्त्याची दैना
By admin | Published: January 28, 2017 01:08 AM2017-01-28T01:08:08+5:302017-01-28T01:08:08+5:30
नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे
ग्रामस्थांना नाहक त्रास : माहिती देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष
हिंगणघाट : नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरूस्तीकरिता संबंधीतांना वेळोवेळी माहिती देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
नजीकचे मांगली हे गाव समुद्रपूर तालुक्यात येत असून ५०० लोकवस्तीचे हे गाव आहे. स्वातंत्र काळापासून या गावातील नागरिक रस्त्याच्या समस्येने त्रस्त आहे. मांगली या गावात जाण्याकरिता राष्ट्रीय महामार्गा सात वरील उबदा या गावाजवळून रस्ता आहे. उबदा येथून मांगली या गावाचे २.२५ कि.मी. अंतर आहे. या रस्याचे खडीकरण १५ वषापूर्वी झाले. तसेच त्यातील केवळ ५०० मीटरचे डांबरीकरण झालेले आहे. मांगली येथील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता हाच रस्त्या असून तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.परंतू, तत्कालीन करण्यात आलेले रस्त्याचे खडीकरण सध्या पूर्णपणे उखडले आहे. परिणामी, या रस्त्याने पायी जाणाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करूनच पुढील प्रवास करावा लागतो. मांगली येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी हिंगणघाट, समुद्रपूर व उबदा येथे याच दैनावस्था झालेल्या रस्त्याने प्रवास करून शाळा गाठतात. तर शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी याच खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांची समस्या निकाली निघावी म्हणून संबंधीतांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या अद्यापही कायम आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे मांगली येथील ग्रामस्त मेटाकुटीस आले आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी व संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
४उबदा-मांगली रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शंकर आडे, गणपत नवघरे, शंकर खडसे, अशोक उईके, विनोद राऊत, महेश राऊत, भास्कर हिवरकर, रमेश हिवरकर, रमेश वैद्य, गजानन पिसुड्डे, प्रभाकर बैलमारे, गणपत डहाके, आशीष मसराम, रवी सिडाम आदींनी उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.