जामणी येथे शेतात आढळले गुलाबी बोंड अळीचे पतंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:21 AM2018-08-02T00:21:10+5:302018-08-02T00:21:45+5:30
निजामपूर पाठोपाठ जामणी येथील शिवारात गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळल्याने परिसरातील शेतकरी हादरले आहे. मागील वर्षी कपाशी निघण्याच्या हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु या वर्षी मात्र पऱ्हाटीचे पीक अनुकुल परिस्थितीत येण्या अगोदरच गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : निजामपूर पाठोपाठ जामणी येथील शिवारात गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळल्याने परिसरातील शेतकरी हादरले आहे.
मागील वर्षी कपाशी निघण्याच्या हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु या वर्षी मात्र पऱ्हाटीचे पीक अनुकुल परिस्थितीत येण्या अगोदरच गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून येत आहे.
नजीकच्या जामणी येथील शेतकरी विलास राऊत यांच्या जामणीतील शेतात बोंड अळीचे पतंग आढळून आले. त्यांनी तीन दिवसापूर्वीच पाच एकर कपाशीच्या शेतामध्ये सापळे लावले होते. सदर शेतकरी शेतात गेले असता त्यांनी सापळ्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना एका सापळ्यामध्ये चक्क तीन पतंग दिसून आले. त्यांचा विश्वास बसत नसल्यामुळे व खात्री करून घेण्याकरिता त्यांनी कृषी सहाय्यक मेसरे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता मेसरे यांनी त्वरीत राऊत यांचे शेत गाठले व सदर शेताची पाहणी केली. तेव्हा त्यांना सापळ्यातील पतंग दाखविण्यात आले. कृषी सहाय्यकानी पाहणी करताच सदर पतंग गुलाबी बोंड अळीचे असल्याचे सांगितले व त्यांनी याचा नायनाट कसा करायचा व पतंग होणार नाही याबाबत सदर शेतकऱ्याला मार्गदर्शन केले. कमी प्रमाणात पतंग असल्यास निंबोली अर्कची फवारणी करावी जर अधिक प्रमाण असल्यास किनॉलफॉस औषधी फवारावी असे ही कृषी सहाय्यक यांनी शेतकºयास सांगितले. या घटनेमुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक सध्या मार्गदर्शन करीत आहेत.
जिल्ह्यातील परिस्थितीवर कृषी विभागाची नजर
आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात बोंडअळी आल्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पीकांची पाहणी केली. त्यांनतर या गावात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी ही दौरा केला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ठिकठिकाणी सापळे लावण्याबाबत कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. व विनामूल्य सापळे वितरीत केले जात आहे.
मला माहिती मिळताच मी राऊत यांच्या शेतात जाऊन पऱ्हाटीची पाहणी केली असता लावलेल्या सापळ्यामध्ये गुलाबी बोंड अळीचे तीन पतंग आढळून आले व पतंग नष्ट करायला सांगितले.
- ए.डब्ल्यु. मेसरे, कृषी सहाय्यक जामणी मंडळ सोनेगाव (आ.).
गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी कृषी विभागाने त्वरीत उपाय योजना कराव्यात अन्यथा याही वर्षी शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर पऱ्हाटीचे झाडे आत्ताच उपटावे लागतील.
- विलास राऊत, शेतकरी, जामणी.