कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:29 PM2017-11-07T23:29:00+5:302017-11-07T23:29:11+5:30
बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.
संजय बिन्नोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.
देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकरी विजय पेटकर, दिलीप श्रीराव, श्रीकांत शिरे या शेतकºयांनी बी.टी. कपाशीची लागवड केली. पिकही वाढले, पात्या, फुले व्यवस्थीत आली. एका एका झाडाला ८० ते १०० बोंडे आहे; पण ही बोंडे गुलाबी अळीने पोखरलेली दिसली. त्यामुळे एकाही बोंडात कापूस नाही, केवळ गुलाबी अळीच आहे. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळांचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर होण्याचा शक्यता वर्तविली जात आहे.
शुद्ध बोंड दाखवा हजार रुपये मिळवा
येथील शेतकरी दिलीप श्रीराम यांनी तर बी.टी. कंपणीला व कृषी अधिकाºयांना एका कपाशीच्या झाडाला असलेल्या बोंडापैकी एक निरोगी बोंड दाखवा आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घ्या असेच आवाहन मी केले आहे.
गुन्हा कधी दाखल होणार
येथील शेतकºयांनी बी.टी. कंपनीची या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाºयांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाºयाकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेत कंपनी विरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तशी तक्रार व चौकशी अहवाल देवळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे कळले. पण कुठलीही कार्यवाही नाही. या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकºयांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यवतमाळात मदतीची कार्यवाही, वर्धेत मात्र केवळ चर्चाच
महसुल राज्यमंत्री तथा यवतमाळचे आ. संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचे किडलेले चुंगडीभर बोंड मंत्रालयात नेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी सचिव विजयकुमार सिंग यांच्यापुढे ठेवले. मंत्रालयात नाना राठोड यांनी बोंडअळीचे दाहक वास्तव मंत्र्यापुढे मांडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागितले. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारातून येथील शेतकºयांना मदत मिळविण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच असल्याचे दिसते. केवळ विकास कामांच्या नावावर टक्केवारीच्या गणितातच हे खूश असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे.