पाईपलाइन दुरूस्त करून खड्डा बुजविला
By Admin | Published: September 12, 2016 12:49 AM2016-09-12T00:49:27+5:302016-09-12T00:49:27+5:30
स्थानिक बसस्थानक लगतच्या वडगाव मार्गावर पाईपलाईन दुरूस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता.
वृत्ताची दखल : वाहतुकीचा अडसर झाला दूर
सेलू : स्थानिक बसस्थानक लगतच्या वडगाव मार्गावर पाईपलाईन दुरूस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. पाईपलाइनची दुरूस्ती न करता खड्डा तसाच ठेवण्यात आला. त्यात साचलेले दूषित पाणी दररोज नळाद्वारे नागरिकांच्या घरात जात होते. याबाबत ‘लोकमत’ रविवारी वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच पाईपलाईनची दुरूस्ती करून खड्डा बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे वाहतुकीचा अडसर दूर झाला.
नगर पंचायतीने वृत्ताची दखल घेत रविवारी दिवसभर युद्ध पातळीवर पाईपलाइनची दुरूस्तीचे काम हाती घेतले. शिवाय खड्डाही बुजविला. पाईपलाइनची दुरूस्ती झाल्याने दूषित पाण्यापासून होणारा संभाव्य आजाराचा धोकाही टळला. पाण्याच्या जलकुंभात पाणी वाहून नेणारी सिमेंटची पाईपलाइन अनेक दिवसांपासून जमिनीच्या आत फुटली होती. त्या परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तेथील नागरिकांच्या तक्रारीनंतर पाईपलाइन दुरूस्तीसाठी भला मोठा लांबलचक खड्डा खोदण्यात आला; पण पाईप लाइनमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे खड्डा भरत होता. दूषित पाणी नळाद्वारे जात होते. महिन्याभऱ्यापासून खड्डा खोदून पाईप दुरूस्त करण्यात आलेला नव्हता. यामुळे वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशीत केले. वृत्त उमटताच नगरपंचायतीने दखल घेतली. नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देत पाईपलाइन दुरूस्ती व खड्डा बुजविण्याचे काम पूर्ण केले. यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)