रस्त्यावरील ‘तो’ खड्डा अद्याप तसाच
By admin | Published: April 22, 2017 02:15 AM2017-04-22T02:15:30+5:302017-04-22T02:15:30+5:30
गावातील पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने दुरूस्तीकरिता पाईपलाईन खोदण्यात आली.
वाहतुकीचा खोळंबा : पाईपलाईन दुरुस्तीकरिता केले होते खोदकाम
रोहणा : गावातील पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने दुरूस्तीकरिता पाईपलाईन खोदण्यात आली. व्हॉल्व्ह दुरूस्त करून महिन्याभराचा कालावधी लोटला. मात्र तरी तो खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यामुळे वातुकीचा खोळंबा होत असून शुक्रवारी सकाळी नागरिकांनी याचा निषेध नोंदविला.
येथील सुभाष वॉर्ड क्रमांक २ मध्ये नळ योजनेचा व्हॉल्व्ह लिकेज होता. त्यामुळे येथील पाणी पुरवठा प्रभावीत झाला. याची दुरुस्ती करण्याकरिता व्हॉल्व्ह उघडण्यात आला. यासाठी खोदकाम केले. त्यानंतर पंधरा दिवस दुरुस्ती केली नाही. त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा बंद होता. नागरिकांनी तक्रार केल्यावर लिकेजची दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यात पुन्हा बिघाड आला. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे याविषयी वारंवार तक्रार देण्यात आली. त्यानंतर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिवाय खोदकाम करुन ठेवल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली. वाहन चालकांना येथून वाहन घेऊन जाताना अडचणीचा सामना करावा लागला. एकीकडे वाहतुकीची कोंडी आणि दुसरीकडे पाणी असताना टंचाईचा सामना करावा लागल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत दोन तासातच व्हॉल्व्ह सुरळीत करण्यात आला. नळाला पाणी येणार असल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. यानंतरच बंद वाहतूक सुरळीत केली. या सर्व प्रकाराचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.(वार्ताहर)
ग्रामस्थांनी नोंदविला निषेध
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले. शिवाय हा काळ लग्नसराईचा असल्याने नागरिकांना वापराकरिता मुबलक पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. लहानसहान दुरुस्तीकरिता विलंब करण्यात येतो. हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा आहे, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने निषेध नोंदविण्यात आला.