भोजाजी देवस्थानला केंद्रीय तीर्थक्षेत्र विकास योजनेत स्थान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:59 PM2019-02-04T21:59:01+5:302019-02-04T21:59:15+5:30
तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानचा केंद्रीय तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी मंदीर विश्वस्त मंडळाच्यावतीने केंद्रीय जलसंधारण, भूपृष्ठ वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानचा केंद्रीय तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी मंदीर विश्वस्त मंडळाच्यावतीने केंद्रीय जलसंधारण, भूपृष्ठ वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांची ना. नितीन गडकरी यांच्याशी भेट घालून दिली. यावेळी सदर मागणीचे निवेदन ना. गडकरी यांना सादर करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भासह राज्यातील अनेक भाविकांचे आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थान श्रद्धास्थान आहे. येथे हजारो क्विंटल पुरणाचा प्रसाद नागरिकांना नैवद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील सुमारे ५० हजारांच्यावर भाविक येथे भेट देतात. या परिसरात नागरी सुविधांसोबतच पर्यटकांच्या दृष्टीने इतर सोयी निर्माण करण्यासाठी या देवस्थानचा केंद्रीय पर्यटन विकास आराखड्यात समावेश करावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. या देवस्थानच्या विकासासाठी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी प्रयत्न सुरू केले असून ना. गडकरी यांनी वडनेर राष्ट्रीय महामार्गापासून ते आजनसरा देवस्थानापर्यंत द्विपदरी सिमेंट रोडच्या कामाला मंजूरी दिली असल्याचे कळविण्यात आले आहे.