दवाखाना इमारत बांधकामाची नियोजित गैरसोईची जागा बदलली
By admin | Published: September 2, 2016 02:09 AM2016-09-02T02:09:39+5:302016-09-02T02:09:39+5:30
दवाखाना इमारत बांधकामासाठी सर्वदृष्टीने सोईची जागा देण्यास दानदाता विना अट उत्सुक असताना ग्रा.पं. ने बहुमताच्या जोरावर गैरसोईची
वृत्ताची दखल : जुना ठराव केला रद्द, नवीन ठराव मंजूर
आकोली : दवाखाना इमारत बांधकामासाठी सर्वदृष्टीने सोईची जागा देण्यास दानदाता विना अट उत्सुक असताना ग्रा.पं. ने बहुमताच्या जोरावर गैरसोईची जागा निवडली होती. तत्सम ठरावही मंजूर केला होता; पण ‘लोकमत’ने वाचा फोडताच अधिकाऱ्यांनीही नियोजित जागा गैरसोईची असल्याचा अभिप्राय दिला. परिणामी, मंगळवारी झालेल्या मासिक सभेत पूर्वीचा ठराव रद्द करून नव्याने सोईच्या जागेवर इमारत बांधकामाचा ठराव घेतला.
येथील आयुर्वेदिक दवाखान्याला निधी मंजूर झाल्यानंतर जागेचा शोध घेत असताना अरुण एकनाथराव इंगोले यांनी आपल्या माळेगाव (ठेका ) रोडवरील ऐन मोक्याची ५ हजार स्क्वेअर फुट जागा विनाअट व विनामूल्य देण्याची तयारी दर्शविली होती. विशेष म्हणजे, ही जागा कार्यक्षेत्रातील जामणी, मसाळा, तामसवाडा, आमगाव व मदनी येथील रुग्णांसाठी सोईची होती. दोन टोकावरील जामणी आणि मदनीपासून हे ठिकाण मध्यवर्ती आहे.
याउलट ग्रामपंचायतने निवड केलेली जागा भीमराव श्रावण गोमासे यांचे शेत असून ते नाल्याच्या काठावर दलदलीच्या ठिकाणी आहे. शिवाय आकोली बस स्थानकापासून एक किमी अंतरावर आहे. ती ये-जा करण्यासाठी अत्यंत गैरसोईचे होती. मंजूर जागेचे विक्रीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करून द्यावे लागते. शेतातील तुकड्यांचे विक्रीपत्र होत नाही. दाणदात्याने देऊ केलेल्या जागेचा एनए झाला आहे. विक्रीपत्र होते. यामुळे ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. यानंतर अनिल दखणे, संजय काकडे व इतरांनी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली.
जि.प. प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी डॉ. आर.आर. राठोड यांना मोका पाहणीसाठी पाठविले. यात ‘लोकमत’चे वृत्त खरे असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामपंचायतने व्हीजीट बुकवर तसा अभिप्राय लिहिला. अखेर मंगळवारी झालेल्या मासिक सभेत पूर्वी निवडलेली भीमराव गोमासे यांच्या शेतातील जागा रद्द करून व दाणदाते अरुण इंगोले यांच्या ले-आऊटमधील ५ हजार स्क्वेअर फुट जागेत दवाखाना इमारत बांधकाम करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामुळे दवाखान्या इमारतीच्या बांधकामाचा तिढा सुटला आहे. नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)