नियोजन करणारेच जीवनात यशस्वी होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:30 AM2019-02-10T00:30:41+5:302019-02-10T00:31:30+5:30
जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले. आज तरूणाईत नियोजनाचा अभाव आहे. या तरूणांना आकाशात झेप घेण्याची भरारी आईवडिलांनी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन लेखक व विचारवंत नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
सारथी बहउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद विचार केंद्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने दोन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ‘सोड नाराजी घे भरारी‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महोत्सवाचे उद्घाटन शहीद अधिकारी प्रफुल्ल मोहोरकर यांच्या मातोश्री सुधा मोहोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, महोत्सवाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री, सिंदी ड्रायपोर्टचे संचालक प्रशांत बुर्ले, विवेकानंद केंद्राचे वर्धा प्रमुख प्रा. शेषराव बावणकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मोहोरकर म्हणाले, भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आपण या पावनभूमीत जन्माला आलो, ही भाग्याची गोष्ट आहे.
आज देशात अध:पतन मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे रोखण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मागील आठ वर्षांपासून शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक अविनाश देव यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून २ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कार्यशाळा व्यक्तीच्या दृष्टी बदलण्यासाठी लाभदायक ठरणारी आहे, असे सांगितले.
नितीन बानगुडे पाटील म्हणाले , चिंतन विचारातून होते. विचार हे मनातून येतात. माणसाचा पराभव पहिले मनात होतो. त्यानंतर तो रणांगणात होतो. तुमचा पराभव कुणीच रोखू शकत नाही. तुमचे मन ठाम असायला हवे, कुणीही प्रगती प्रगती रोखू शकणार नाही. माणूसच माणसाला घडवितो आणि बिघडवितो. आपला निश्चय पक्का असायला हवा. कष्ट करण्याची तयारी हवी, संधी निर्माण करावी लागते, ती चालून येत नाही. संधी आली, पण ती हुकली असे म्हणण्याची वेळ येऊच देऊ नका. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावर साºया गोष्टी अवलंबून आहे. आत्मविश्वास हा संसर्गजन्य आहे. स्वत:ला मर्यादा घालून जगू नका, बंधन घालून जगू नका, अनुभवातून नवनिर्माण होते. त्यामुळे गरूडझेप घेण्याची तयारी ठेवा, संघर्ष तुमची उंची वाढवितो. कष्टाचे फळ प्रत्येकालाच मिळते. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सातत्य, चिकाटी हे सामर्र्थ्यशाली शस्त्र आहेत. अशा परिस्थितीत अनुभव हा सर्वोत्तम गुरू आहे. यश आणि अपयश यामध्ये भिती उभी असते. तुम्ही कृती केल्यावर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे कृती करा व स्वत: विषयीचा आत्मविश्वास वाढवा, या साºया बाबी त्यांनी विविध दाखले व उदाहरण देऊन समजावून सांगितल्या. बानगुडे यांचा परिचय सुमित उरकुडकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले व मेघा मेश्राम यांनी केले. त्यानंतर दुसºया सत्रात पालकत्व एक कला या विषयावर प्रभू अमोघ लीला यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.