वर्धा नदीच्या पात्रामध्ये वनस्पती व घाण

By admin | Published: May 27, 2015 01:54 AM2015-05-27T01:54:14+5:302015-05-27T01:54:14+5:30

भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल,..

Plants and dirt in the Wardha river bed | वर्धा नदीच्या पात्रामध्ये वनस्पती व घाण

वर्धा नदीच्या पात्रामध्ये वनस्पती व घाण

Next

प्रशांत हेलोंडे  वर्धा
भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण आता ती धुसर होत आहे. वर्धा नदीच्या पात्रात पुलगाव येथे विविध वनस्पती वाढली असून घाणही साचली आहे. यामुळे पिण्यासह शेती, उद्योगांना पाणी पुरविणारी वरदायिनी कधी स्वच्छ होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य प्रदेशातून वाहत येणारी वर्धा नदी अमरावती, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याकरिता वरदायिनी ठरली आहे. या नदीवर अप्पर वर्धा व निम्न वर्धा अशी दोन धरणे असून पुलगाव येथेही बॅरेज होऊ घातला आहे. पिण्यासह सिंचन व उद्योगांना पाणी पुरवित असतानाच जिल्ह्याला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही वर्धा नदीचे पात्र करीत आहे. या नदीवर असलेल्या रेती घाटांतून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो; पण नदी पात्राकडे पर्यायाने पर्यावरण समतोलाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचेच दिसते. सध्या पुलगाव येथे वर्धा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. निम्न वर्धा प्रकल्प असलेल्या धनोडी, आर्वी तालुक्यात आणि पूढे चंद्रपूरकडे जाणारे पात्रही घाणीच्या विळख्यात अडकले आहे. पुलगाव येथील पात्रात विविध वनस्पतींची वाढ झाली असून घाणही साचली आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आहे. पुलगाव नगर परिषद तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी पात्राला जीवन देणे गरजेचे झाले आहे.
महसुलाकडे दिले जाते लक्ष; पात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव
वर्धा नदीवर जिल्ह्यातील आष्टी, आर्वी आणि देवळी तालुक्यात रेती घाट आहेत. शिवाय अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातही घाट असून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यातून तीनही जिल्ह्यांना कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो; पण वर्धा नदीच्या पात्राकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. किंबहुना ज्या गावांमध्ये रेती घाट आहेत, त्या गावांच्या विकासाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पुलगाव शहराच्या सिमेवरून वाहणारी वर्धा नदी वरदान ठरली आहे; पण या वरदायिनीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
वर्धा नदीचे पात्र अनेक ठिकाणी झाडा-झुडपांसह विविध वनस्पती व घाणीच्या विळख्यात सापडले आहे; पण ते साफ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. शिवाय पात्र उथळ झाल्याने पाणी साठत नाही. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा धोका असतो. पावसाळ्यात अनेक गावांना धोक्याचा इशारा दिला जातो; पण पात्र खोलीकरण वा स्वच्छतेकडे कुणी लक्ष देत नाही.
काही दिवसांपूर्वी पवनार येथील धाम नदीच्या स्वच्छतेचा फार्स करण्यात आला; पण ते पात्रही साफ झाले नाही. यामुळे तेथेही हीच समस्या भेडसावत आहे. नदी स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी वर्धा जिल्ह्यातील नद्यांपर्यंत हे अभियान पोहोचलेच नसल्याचे दिसते. यामुळेच नदीचे पात्र धोक्यात आले आहे.
पुलगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी वनस्पती वाढली असून शेवाळ साचले आहे. काही ठिकाणी निर्माल्यही नदीतच टाकले जाते. नदी पात्राला झुडपांचा वेढा पडला आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता अभियानाला वेग देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Plants and dirt in the Wardha river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.