प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बाजारपेठेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:49 PM2019-08-17T23:49:52+5:302019-08-17T23:50:44+5:30
प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी धोक्याच्या ठरत असल्याने त्यांच्या निर्मितीसह विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्धा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीकरिता आल्या असल्याने जिल्हा प्रशासनाने वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी धोक्याच्या ठरत असल्याने त्यांच्या निर्मितीसह विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्धा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीकरिता आल्या असल्याने जिल्हा प्रशासनाने वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. ही सर्व मूर्ती अमरावती जिल्ह्यातून आयात करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती मूर्तीची तर अनेकांच्या भाविकांच्या घरी घरगुती गणपतीची स्थापना केली जाते. जिल्ह्यात सुमारे १५ हजारच्यावर घरगुती तर २ हजारांच्यावर सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना होते. दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने भाविक श्रीगणेशाचे पूजा-अर्चना करतात. शिवाय गत वर्षी पर्यावरणासाठी धोक्याची ठरत असलेल्या पीओपीची गणेश मूर्ती विक्री होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात आली होती. परंतु, यंदा काही छोट्या व्यावसायिकांनी श्रावण महिन्यातच पीओपीची गणेश मूर्ती विक्रीसाठी आणली आहे. शिवाय काही ठिकाणी दुकानेही थाटण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीओपीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे) या भागात आणून ठेवल्याची चर्चा मूर्तीकारांंमध्ये होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी संबंधितांची तातडीची बैठक लावून त्यांना कार्यवाहीसाठी योग्य सूचना करण्याची मागणी आहे.