बोरधरण परिसरात पर्यटकांकडून प्लास्टिकचा कचरा
By admin | Published: September 14, 2016 12:47 AM2016-09-14T00:47:59+5:302016-09-14T00:47:59+5:30
बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात.
जनावरांचा जीव धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे
सेलू : बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात. मोकाट जनावरे अन्नाचे कण लागून असल्याने पूर्ण प्लास्टिक खाऊन टाकतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पर्यटनस्थळ असलेल्या बोरधरण, बोर व्याघ्र प्रकल्पात प्रदूषण होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पर्यटकांनी आपल्याकडून या परिसरात घाण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे; पण निष्काळजीपणा परिसरातील स्वच्छतेला बाधा पोहोचवित असल्याचे दिसते. खाऊन झाल्यावर उष्टे अन्न तेथेच टाकून दिले जाते. यामुळे कालांतराने दुर्गंधी पसरते. बोरधरणाचे नैसर्गिक सौंदर्य न्याळाण्यासाठी आलेल्या इतर पर्यटकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो.
बोरी गावची वन व्यवस्थापन समितीकडून धरणावर येणाऱ्या पर्यटकाकडून उपद्रव शुल्काच्या नावाखाली पैसे घेतले जातात; पण त्यांनी केलेला उपद्रव स्वच्छ केला जात नाही, असा आरोपही होत आहे. बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे; पण सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड होतो. संबंधितांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपायोजनांचा अभाव
बोरधरण आणि बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. धरणाच्या पाण्यापर्यंत सहज जाता येत असल्याने पर्यटक त्याच परिसरात केरकचरा टाकून ठेवतात. परिणामी, पर्यटनस्थळी प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे प्राण्यांचे जीवनही धोक्यात येत असल्याचे दिसते. बोर व्याघ्र प्रकल्प व बोरधरण प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.