खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात प्रतिभा निर्माण करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:33 PM2017-09-14T23:33:01+5:302017-09-14T23:33:26+5:30
शासनाच्यावतीने खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक गुणाची सवलत मिळते. तसेच नोकरीत सुद्धा आरक्षण दिल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक गुणाची सवलत मिळते. तसेच नोकरीत सुद्धा आरक्षण दिल्या जात आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्यासोबतच शारीरिक विकास होतो. यासाठी खेळाडूंनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात प्रतिभा निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे यांनी मिशन फुटबॉल पुर्वतयारी कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र मिशन १ मिलीयम अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, क्रीडा प्रशिक्षक डोबाळे व सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
भारतामध्ये फुटबॉल या खेळाला महत्त्व कमी आहे. जागतिक दर्जाच्या या खेळाला भारतात महत्त्व मिळावे यासाठी प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी एका दिवशी दर्शनी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात सर्व खेळाडंूनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी टेंभुर्णे यांनी केले.
या कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी राज्यासह जिल्ह्यात एकाच दिवशी दर्शनी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४०९ शाळा आजच्या फुटबॉल सामन्यात सहभागी होणार आहे. संबंधित शाळांना प्रत्येकी ३ फुटबॉलचे वितरण सुद्धा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फुटबॉलचे दर्शनी सामने होणार आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे सुद्धा उद्या सकाळी ८ वाजता दर्शनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, शिक्षक सहभागी होणार आहे. यासाठी फुटबॉलची सात मैदान तयार करण्यात आले आहे. सर्व क्रीडा प्रेमींनी फुटबॉल सामन्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.