इंझाळा येथील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करा
By admin | Published: April 20, 2017 12:53 AM2017-04-20T00:53:57+5:302017-04-20T00:53:57+5:30
नजीकच्या इंझाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून रस्ता
कामाचे देयक थांबविण्याची नागरिकांची मागणी : निविदेप्रमाणे न करता कंत्राटदाराच्या मर्जीने बांधकाम
विजयगोपाल : नजीकच्या इंझाळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय सिमेंट नालीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम नियमांना डावलुन करण्यात येत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इंझाळा येथील लुकमान सय्यद यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता बांधकाम हे प्राकलनानुसार नव्हे, तर कंत्राटदाराच्या मर्जीने होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याची रुंदी २.५ मीटर केली आहे. त्यामुळे येथून आवागमन करताना त्रास होणार आहे. तसेच बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे. या बांधकामावर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे बांधकामाची मजबुती कितपत आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे.
रस्ता व नालीचे निकृष्ट बांधकाम सुरू असताना बांधकाम विभागाकडून याची पाहणी केली जात नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. हे काम करताना कंत्राटदाराकडून नियम पायदळी तुडविल्या जात आहे. बांधकाम होत असताना बांधकाम विभागाचे कर्मचारी तेथे हजर असणे, कामाची पाहणी करणे गरजेचे असते. मात्र, येथे एकही कर्मचारी फिरकला नाही. याबाबत अनेकदा तक्रारी बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या. गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
बांधकाम सुरू करण्याचे पत्रही ग्रामपंचायतीला देण्यात आले नाही. गावात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये होत गैरप्रकार पाहता याची चौकशी करुन दर्जेदार काम करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.(वार्ताहर)