माझिया जीवा सोसवेना झळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:20 AM2019-06-03T00:20:05+5:302019-06-03T00:20:46+5:30
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
यंदाच्या उन्हाळ्यातील मे महिना हा सर्वाधिक उष्ण राहिला. जिल्ह्याचे तापमान ४६.७ अंशापर्यंत गेले होते. मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार सुरू आहे. त्यामुळे नागरिक होरपळून निघत आहेत. उन्हामुळे नागरिकांना तापाचे आजार होत असून शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचारासाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आणखी दोन तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्याला रुमाल बांधून व गॉगल्स लावूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यावेळी दुष्काळी परिस्थिती आहे. शहरासह सर्वच तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाच्यावतीने उपाययोजना केवळ कागदावरच राबविल्या जात असल्याचे चित्र आहे. वर्धा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरात खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो अपुरा पडत आहे. नळाद्वारे पाच-सहा दिवसांआड कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. विंधन विहिरी-कूपनलिकांचा कोरड पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातही पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. जिल्ह्यात केवळ आष्टी तालुक्यातच प्रशासनाद्वारे टँकरद्वारे टँकरने पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी उन्हात रांगा लागत आहेत.
उष्माघात होऊ नये, यासाठी खबरदारी घ्या
वाढत्या तापमानामुळे सध्या उष्माघाताची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऊन लागल्यामुळे रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. तापाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऊन लागल्यास वेळीच उपचार करावा. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णतामान कायम राहणार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे, काम करणे टाळावे असे डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी
वर्धा जिल्ह्यात यंदा उष्णतामान अधिक आहे. मे अखेरीस पाऱ्याचा प्रवास ४६ अंश सेल्सिअसवरच राहिला. प्रखर उष्णतामानामुळे शहरासह गावखेड्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होतात. बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. जिल्ह्यातील विविध भागात उष्माघाताने मागील ४८ तासांत तीन जणांचा मृत्यू झाला. यात वर्धा व समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील प्रत्येकी एक आणि आष्टी (शहीद) तालुक्यातील तळेगाव श्यामजीपंत येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून उष्माघाताने मृत्यू झालाच नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.