धुऱ्यावर तणनाशक फवारल्याने कपाशी धोक्यात
By admin | Published: September 24, 2015 02:42 AM2015-09-24T02:42:21+5:302015-09-24T02:42:21+5:30
तणनाशकाचे दुष्परिणाम किती भयानक होतात, याचा अनुभव शेतकरी श्रीधर नासरे यांना आला आहे.
पिके पडली पिवळी : मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणी
विरूळ (आ.) : तणनाशकाचे दुष्परिणाम किती भयानक होतात, याचा अनुभव शेतकरी श्रीधर नासरे यांना आला आहे. धुऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात धुऱ्यावर तणनाशक फवारल्याने त्यांच्या शेतातील नऊ एकर कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.
श्रीधर नासरे यांनी मनीषा डोईजड यांच्या मालकीचे नऊ एकर शेत मक्त्याने केले आहे. नऊ एकरातील कपाशीचे पीक चांगले आले असताना बाजूच्या शेतकऱ्याने धुऱ्यावर तणनाशक फवारले. हवा असल्याने हा फवारा नासरे यांच्या कपाशी पिकावर उडाला. यामुळे त्यांची नऊ एकरातील कपाशीचे संपूण पीक खराब होऊन धोक्यात आले आहे.
कपाशीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी अनेकांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी केली; पण कपाशीच्या पिकात सुधारणा झाली नाही. याबबात त्यांनी कृषी विभागाला कळविले. यावरून मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खेडकर, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. दवणे यांनी सदर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना नासरे करीत आहेत; पण पिकांमध्ये सुधारणा दिसत नसल्याने त्यांना नुकसान सोसावे लागणार असल्याचेच दिसते. शेतकऱ्यांनी पिकांवर तणनाशकाची फवारणी करताना काळजी घेणेच गरजेचे झाले आहे. यासाठी उपाययोजना सुचविणे गरजेचे आहे.(वार्ताहर)