आगाऊ धान्यातून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली

By admin | Published: May 14, 2016 02:00 AM2016-05-14T02:00:54+5:302016-05-14T02:00:54+5:30

शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीस आणलेल्या धान्यातून क्विंटलमागे २५० ग्रॅम धान्य आगाऊ घेऊन व्यापाऱ्यांचा लाभ करून ...

The plunder of the farmers in advance food stopped | आगाऊ धान्यातून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली

आगाऊ धान्यातून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली

Next

कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार : अन्य गैरप्रकारांनाही लागला चाप
आर्वी : शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीस आणलेल्या धान्यातून क्विंटलमागे २५० ग्रॅम धान्य आगाऊ घेऊन व्यापाऱ्यांचा लाभ करून देण्याचा अजब प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू होता. गत कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केला. हा विरोध लक्षात घेत बाजार समिती व्यवस्थापनाने सदर अफलातून प्रकार बंद केला. यामुळे अन्य गैरप्रकारांनाही चाप बसला आहे.
बाजार समितीच्या वार्षिक आमसभेत येथील शेतकरी मनीष उभाड यांनी आगाऊ घेतल्या जाणाऱ्या धान्याबाबत सभापतींना विचारणा केली. बाजार समितीत धान्याच्या आवकीनुसार हिशेब काढून हा प्रकार किती गंभीर आहे, याची जाणीव करून दिली. शेतकऱ्याने व्यवस्थापनासमोर २०१२-१३ ते २०१४-१५ या वर्षातील आकडेवारीच ठेवली. यात २५० ग्रॅमच्या हिशेबाने तूर २४५ क्विंटल ९ हजार रुपये भावाने २३ लाख रुपये, सोयाबीन ५५० क्विंटल ४ हजार रुपये दराने २२ लाख रुपये, चना १२५ क्विंटल ४ हजार रुपये दराने ५ लाख रुपये, अशा ५० लाख रुपयांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी केली. डोळे दिपवणारी ही आकडेवारी लक्षात घेत बाजार समिती व्यवस्थापनाने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन आगाऊ धान्य न घेण्याची ताकिदच दिली.
आगाऊ धान्याचा प्रकार संचालकांना माहिती होता. आमसभेत प्रश्न विचारताच संचालकांनी मात्र आगाऊ धान्य बंद होऊ शकत नाही. व्यापाऱ्यांना प्रती क्विंटल २५० ग्रॅम धान्य दिले नाही तर ते धान्याची खरेदी करीत नाही. यामुळे प्रती क्विंटल २५० ग्रॅम धान्य व्यापाऱ्यांना दिले जाते, असे बेजबाबदार उत्तर दिले. यावरून कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी की व्यापाऱ्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत होता.
शेतकऱ्यांच्या धान्याचे वजन करताना जाणीवपूर्वक पोत्यातील धान्य हमाल खाली सांडवितात. दिवसभरात सर्व शेतकऱ्यांचे सांडविलेले धान्य गोळा करून त्यांची विक्री करतात. या प्रकाराला उभाड व अन्य शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. याबाबत बाजार समितीकडे तक्रारीही केल्या; पण अद्याप त्याकडे लक्ष देण्यात आले नव्हते. आता आगाऊ धान्य देण्याची पद्धत मोडीत निघाल्याने या गैरप्रकारावरही चाप बसला आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The plunder of the farmers in advance food stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.