युवकांचे कचऱ्याने ‘जेब भरो’
By Admin | Published: July 10, 2017 12:55 AM2017-07-10T00:55:47+5:302017-07-10T00:55:47+5:30
शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले.
युवा परिवर्तनचा सहभाग : स्वच्छता आंदोलनाचा आठवा टप्पा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले. युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातील प्रभागात प्रत्येक शनिवार व रविवारी स्वच्छता आंदोलन केले जाते. याच आंदोलनात प्रभाग क्रमांक आठ मध्ये स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खिशात कचरा भरून घेत जेब भरो आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.
यावेळी प्रभागातील नागरिकांनी कार्यकर्त्यांकडे अस्वच्छता व त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधी व वाढत्या रोगराईकडे नगरपालिकेचे होणारे दुर्लक्ष याबाबत समस्या मांडल्या. पालिकेने स्वच्छता अभियान राबविले मात्र ते वरवरचे होते, अशा शब्दात तीव्र रोष व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत पावडे चौक, गोंड प्लॉट, पठाण यांच्या घराजवळील परिसर, सराफ गॅस एजन्सी व परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधला. प्रभागात कुठेच कचरा पेट्या ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. काही ठिकाणी तर कचरा फेकायला जागा नाही. नाल्या वेळेवर साफ होत नाही. लोकप्रतिनिधी समस्या सांगितल्यावर दुर्लक्ष करतात. काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात येते. हा प्रभाग एकप्रकारे डम्पींग झोन झाल्यासारखा आहे. येथे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा वाजला आहे. नाल्या सफाई केल्यावर बाहेर काढलेला कचरा कित्येक दिवस नाल्यांच्या बाजुला पडून असतो, याकडे लक्ष देण्याची मागणी केली. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, प्रगती देशकर, प्रिती घंगाळ, जयंती मिश्रा, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, सौरभ माकोडे, शैलेश पंचेश्वर, धरम शेंडे, आकाश हातागळे आदींचा सहभाग होता.
स्वच्छता कराचा निषेध
प्रभागातील वाढत्या कचऱ्याचे प्रमाण पाहता नागरिकंनी स्वच्छता कर का भरावा, असा प्रश्न उपस्थित केला. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती होते. ही बाब रोगराईला निमंत्रण देत आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी नागरिकांच्या व्यथा ऐकायला तयार नाही, अशी व्यथा यावेळी मांडली.