कर्जबाजारी दाम्पत्याने घेतले विष; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू, पत्नी वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 15:34 IST2022-02-10T15:22:11+5:302022-02-10T15:34:24+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारादरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला तर पत्नीला उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

कर्जबाजारी दाम्पत्याने घेतले विष; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू, पत्नी वाचली
वर्धा : डोक्यावर कर्जाचं डोंगर व परिस्थितीला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारादरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला तर पत्नीला उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथे ही घटना उघडकीस आली. राजेंद्र चरडे व पत्नी अर्चना चरडे अशी या दोघांची नावं असून त्यांनी ९ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष घेतल्याची माहिती मिळताच दोघांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात काही दिवसात पत्नी अर्चनाला सुट्टी देण्यात आली. मात्र, मात्र घटनेच्या एक महिन्यानंतर राजेंद्र यांचा मृत्यू झाला.
राजेंद्रकडे दोन एकर शेती असून त्यांना दोन लहान मुली आहेत. त्यांच्या अंगावर बँकेचे ७० हजाराचे कर्ज होते. त्यासोबतच त्यांनी इतरांकडूनही कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यांनी पत्नीच्या नावावरही उमेदच्या गटातून कर्ज काढले आहे.
कर्जाचा वाढता डोंगर व शेतीत होणारे नुकसान आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.