शिळ्या अन्नातून विषबाधा; १३ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:42 PM2018-10-26T23:42:55+5:302018-10-26T23:43:19+5:30
येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील नदीपात्राच्या काठावर टाकलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधेमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला; तर १५ जनावरे अत्यवस्थ आहेत. ही घटना शुक्रवारी घडल्याने शंकरजी देवस्थान परिसरात राहणाऱ्या तीन पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाप्रसादाच्या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले अन्न; नदीपात्राच्या काठावर टाकण्यात आले होते. हे शिळे अन्न शंकरजी देवस्थान परिसरात राहणाºया गजानन ज्ञानेश्वर वाघमारे, उरकुडा कोंडबा समर्थ व सुरेंद्र उमरे यांच्या जनवारांनी खाल्ले. त्यामुळे विषबाधा झाल्याने गजानन वाघमारे यांच्या दोन म्हशी, तीन बकºया व सहा गायींचा मृत्यू झाला, तर दहा जनावरे आजारी आहे. उरकुडा समर्थ यांची एक बकरी तर सुरेंद्र उमरे यांची एक म्हैस दगावली आहे. या तीनही पशुपालकांचे १५ जनावरे अत्यवस्थ असल्याने त्यातील काही जनावरे मृत्यूच्या दाढेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अन् मृत्यूसंख्या वाढत गेली
पशुधन पर्यवेक्षक जी.एस. संगीतवार यांनी घटना कळल्यावर खाजगी मेडिकल स्टोअर्समधून औषधी व सलाईन मागवून उपचार सुरू केले. मात्र एकट्या कर्मचाºयाच्या ते आवाक्याबाहेर होते. सकाळी मृत पावलेल्या जनावरांचा आकडा दुपारी सहावरून तेरावर पोहचला.
तलाठी पवार यांनी पंचनामा केल्यानंतर दुपारी अडीच वाजताच्यादरम्यान पशुधन विकास अधिकारी डॉ. मिना काळे यांनी घटनास्थळी येवून मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर पशुपालकांनी जनावरांवर मातीत पुरून अंत्यसंस्कार केले. यावेळी गरीब पशुमालकांच्या डोळ्यातून अश्रूंनी वाट मोकळी केली.
पशुधन विकास अधिकारी डॉ. मिना काळे तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली असती तर अनेक जनावरांवर उपचार होवून त्यांचे जीव वाचले असते. सर्व पशुमालक भूमिहीन असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. घटनास्थळी माजी जि.प अध्यक्ष विजय जयस्वाल व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. राजेश जयस्वाल यांनी भेट देवून पशुलकांशी चर्चा केली.