पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
By Admin | Published: July 4, 2016 01:44 AM2016-07-04T01:44:45+5:302016-07-04T01:44:45+5:30
स्थानिक खडकपुरा परिसरातील रहिवासी लहानू वैद्य यांच्या घरात अचानक सिलिंडरने पेट घेतला;
स्वयंपाक सुरू असताना गॅस शेगडीने घेतला पेट
आष्टी (श.) : स्थानिक खडकपुरा परिसरातील रहिवासी लहानू वैद्य यांच्या घरात अचानक सिलिंडरने पेट घेतला; पण पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.
खडकपुरा येथील एका घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने उपस्थितांमध्ये घबराट निर्माण झाली होती. याचवेळी काहींनी वैद्य परिवारातील सदस्यांना घराबाहेर काढून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून सतर्कता बाळगत हवाबंद घराची खिडकी तोडली. यानंतर घरात शिरकाव करून गॅसचे रेग्यूलेटर बंद करीत सिलिंडर बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टाळता आला.
खडकपुरा वॉर्डात लहानू वैद्य व त्यांचा मुलगा परिवारासह राहतो. शनिवारी सायंकाळी ७ वाजतादरम्यान स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसच्या शेगडीने पेट घेतला. ही आग सिलिंडरच्या रेग्यूलेटरपर्यंत पोहोचली. यामुळे घरातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, त्यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक राजू दहीलेकर, कर्मचारी कंगाले, अंबुडारे यांनी घरात शिरून सिलिंडर बाहेर काढले. यामुळे आगीचा फैलाव झाला नाही आणि कुटुंबानेही सुटकेचा निश्वास सोडला.(प्रतिनिधी)