पोलीस आले अन चोरटे पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:00 AM2017-12-01T01:00:29+5:302017-12-01T01:01:35+5:30
तुकडोजी वॉर्ड परिसरातील शंकर मुनेश्वर यांच्या घरासमोर असलेली जीप चोरट्यांनी लंपास केली. त्याची तक्रार पोलिसांत होताच तपासाची चक्रे फिरविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तुकडोजी वॉर्ड परिसरातील शंकर मुनेश्वर यांच्या घरासमोर असलेली जीप चोरट्यांनी लंपास केली. त्याची तक्रार पोलिसांत होताच तपासाची चक्रे फिरविण्यात आली. पोलिसांना प्राप्त माहितीवरून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले; पण पोलीस आल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी पोबारा केला. यामुळे आरोपी मोकाटच राहिलेत.
पोलीस सुत्रानुसार, २६ नोव्हेंबर रोजी तुकडोजी वॉर्ड येथील शंकर मुनेश्वर यांच्या घरासमोरील एमएच ३१ डी.व्ही. ९५३२ क्रमांकाचे वाहन अज्ञात चोरट्यानी चोरून नेले. या वाहनाची किंमत ३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर तक्रारीची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळताच शोध सुरू केला. दरम्यान, माहिती मिळताच एमएच ३१ डी.व्ही. ९५३२ क्रमांकाचे वाहन नंदोरी मार्गे जाताना दिसल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पोलिसांनी सदर गाडीचा नागपूर-कामठी मार्गाने शोध घेतला. पोलिसांची खबर लागताच कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे वाहन सोडून चोरटे पसार झाले. येथून पोलिसांनी वाहन जप्त करून ठाण्यात जमा केले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन इप्पर, सचिन भारशंकर यांनी केली.