वर्धा जिल्ह्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:37 PM2019-10-16T16:37:14+5:302019-10-16T16:40:02+5:30

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास बुधवारी दुपारच्या सुमारास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा राऊंड तसेच दारूची बाटली असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Police custody of unlicensed pistol in Wardha district | वर्धा जिल्ह्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

वर्धा जिल्ह्यात विनापरवाना पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देदहा गोळ्याही जप्त अदिलाबाद ते नागपूर करीत होता बसने प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास बुधवारी दुपारच्या सुमारास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा राऊंड तसेच दारूची बाटली असा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-हैद्राबाद मार्गावर असलेल्या स्थिर निगरानी पथकाद्वारे नागरिकांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत असून याच ठिकाणी अदिलाबाद ते नागपूर असा बसने प्रवास करीत असलेल्या सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम (३५) रा. अदिलाबाद, असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग सातवर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसनाखाली एक पिस्तूल अधिकाऱ्यांना दिसून आली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता बसच्या बाहेर दहा जिवंत काडतूस आढळून आले. त्यानंतर सदर घटनेची तातडीने वडनेर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये यांची त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर बस आणि बस मधील प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शिवाय ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशी दरम्यान साहित्य तपासणीसाठी बस थांबताच बसमधील मागील आसनावरील एक इसम पटकन पुढील आसनावर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेख हैदर शेख ईब्राहीम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर पिस्तूल व जिवंत कारतूर त्याच्याच जवळ होते आणि तपासणीत आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य फेकण्यात आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम याच्यावर वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या उपस्थितीत अरुण गुगळे, सुरज मेश्राम, शुभम वानखेडे, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, यादव यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

शस्त्र बाळगण्याच्या उद्देशाचा घेतल्या जातोय शोध
पोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेल्या शेख हैदर शेख ईब्राहीम हा कुठल्या कारणाने शस्त्र बाळगत होता. इतकेच नव्हे तर त्याचा घातपाताचा इरादा तर नव्हता ना आदीचे उत्तर सध्या पोलीस शोधत आहेत.

पिस्तूल बाळगणाऱ्यांला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा कारतूस, एक पिस्तूल, दारूची शिशी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे.
- आशीष गजभिये, ठाणेदार, वडनेर.

Web Title: Police custody of unlicensed pistol in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.