वडनेरच्या पोलिस निरीक्षकांचा झोपेतच झाला मृत्यू
By रवींद्र चांदेकर | Published: June 29, 2024 03:43 PM2024-06-29T15:43:40+5:302024-06-29T15:44:10+5:30
हृदयविकाराचा झटका : रात्री झोपायला शासकीय निवासात गेले अन् झोपूनच राहिले
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील पोलिस निरीक्षकांचा शुक्रवारी रात्री झोपेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज वाढीवे, असे मृत पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळीच घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यातील काम आटोपून नेहमीप्रमाणे परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी गेले होते.
पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून शनिवारी सकाळी मनोज वाढीवे यांना कार्यालयीन कामाकरिता मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. मात्र, वारंवार संपर्क करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी वाढीवे यांचे शासकीय निवासस्थान गाठले. दार वाजवले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अखेरीस निवासस्थानाचे दार तोडण्यात आले. पोलिसांनी घरात प्रवेश करताच पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे मृतावस्थेत दिसून आले. त्यांचा मृत्यू झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.