पोलीस लाईफ... ऑन ड्युटी २४ तास, ना कुटुंबाकडे लक्ष, ना प्रकृतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 PM2021-02-11T16:12:19+5:302021-02-11T16:14:45+5:30

Wardha News पोलीस लाईफ पाहिले तर तेवढे सोपे नाही. पोलिसांचे ना कुटुंबाकडे लक्ष असते, ना त्यांना ड्युटीची वेळ असते. ना त्यांच्या आरामाची वेळ असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

Police life ... 24 hours on duty, no attention to family, no attention to nature | पोलीस लाईफ... ऑन ड्युटी २४ तास, ना कुटुंबाकडे लक्ष, ना प्रकृतीकडे

पोलीस लाईफ... ऑन ड्युटी २४ तास, ना कुटुंबाकडे लक्ष, ना प्रकृतीकडे

Next
ठळक मुद्देमुला-बाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष दिलेला जेवणाचा डब्बा रात्री तसाच येतो परत

 लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : ‘सद् रक्षणाय... खलनिग्रहणाय’ पोलिसांच्या या ब्रीद वाक्याप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी आहे. ऑनड्युटी २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पोलीस लाईफ पाहिले तर तेवढे सोपे नाही. पोलिसांना विविध समस्यांतून, संकटांतून सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांचे ना कुटुंबाकडे लक्ष असते, ना त्यांना ड्युटीची वेळ असते. ना त्यांच्या आरामाची वेळ असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

पाेलिसांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बंदोबस्तासाठी रस्त्यावर यावे लागते. सकाळी कर्तव्यावर निघालेला पोलीस रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतो. कधी दोन शिफ्टमध्ये कामही करावे लागते. यामुळे पोलिसांच्या प्रकृतीसह त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासही त्यांना वेळ मिळत नाही. मोर्चे, आंदोलने, राजकीय पक्षांच्या सभा, मंत्र्यांचे दौरे या सर्व गोष्टींसाठी त्यांना २४ तास सतर्क राहावे लागते. त्यामुळे पोलिसांना किमान पाच मिनिटे आराम करायला वेळ मिळत नाही. अशातच मुले केव्हा मोठी झाली हे त्यांना कळतच नाही. सकाळी निघालेला पोलीस कर्मचारी एकदम मध्यरात्रीच येत असल्याने मुलांशीही भेटीगाठी होत नाहीत. त्यामुळे कुटुंबाकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. मात्र, अशातही पोलीस कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत.

याव्यतिरिक्त दररोज शहरात व जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारी घेणे, आरोपीला पकडणे, त्याला न्यायालयात हजर करणे, आदी कामे पोलिसांना नित्यनियमाने करावी लागतात. पोलिसांना त्यांच्या जीवनात कमी आणि पहिले प्राधान्य नोकरीला द्यावे लागते. त्यांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष देणे पोलिसांना म्हणावे तेवढे सोपे नाही. केव्हा वरिष्ठांचा फोन येईल आणि कधी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, याचा नेम नसतो.

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष देण्यास वेळ नसतो. सकाळी बायकोने भरून दिलेला जेवणाचा डब्बा बंदोबस्तामुळे खाता येत नसल्याने अनेकदा रात्री तसाच परत आणला जातो. मी इतक्या वाजता येईन... आपण बाहेर फिरायला जाऊ... मुलांना घेऊन हॉटेलला जाऊ, असे पोलीस छातीठोकपणे सांगू शकत नाही. सांगितले असेल तर त्या वेळेवर ते पोहोचू शकत नाहीत. अशी जीवनशैली पोलिसांची असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र, कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. नोकरीसाठी पोलीस तेदेखील सहन करून घेतात.

पोलीस ड्युटी १२ तासांची...

वास्तविक पाहता पोलिसांना १२ तासांची ड्युटी असते. मात्र, पोलीस स्टेशनमधील आणि टेबलवर काम करणारे कर्मचारीवगळता पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखेतील कर्मचारी यांना २४ तास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे लागत असून, त्यांच्या ड्युटीची वेळ निश्चित नसते.

कुटुंबाला देता येत नाही वेळ

सकाळी मुले झोपेतून उठण्यापूर्वीच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर निघून जातात. कधी वेळ मिळाला तर मुलांना भेटता येते. मात्र, सकाळी घरून निघालेला पोलीस कर्मचारी मध्यरात्रीच घरी परत येत असल्याने तेव्हाही मुले झोपलेली असतात. यामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही.

शाळेत पालकसभेलाही जाता येत नाही

मुलांचे शिक्षण कसे सुरू आहे, हे पोलिसांना कळत नाही. शाळेत होणाऱ्या पालक सभेलाही उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. असे असतानाही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षित आहेत.

अनेकांकडे स्वत:चे घर नाही

पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. मात्र, अनेक पोलिसांनी आपले स्वत::चे घर बांधले असून, अनेकांडे अजूनही हक्काचे घर नाही. बहुतांश पोलीस कर्मचारी आजही शासकीय निवासस्थानातच राहात असल्याचे चित्र आहे.

माझे पती मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. कुटुंबासाठी त्यांना वेळ नसतो. पाहता पाहता मुलीही मोठ्या झाल्यात. एका मुलीने पदवी पूर्ण केली असून, दुसरी मुलगी बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. कोरोना काळात सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मुलांना वेळ देता येत नाही. स्वत:च्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष होते. सकाळी नेलेला जेवणाचा डब्बा खाण्यासही त्यांना वेळ नसतो. रात्री दिलेला डब्बा तसाच परत येतो. पगारही कधी उशिराने होत असल्याने संसार कसा चालवावा, असा प्रश्न पडतो.

वर्षा श्रीरंग मारबते, पोलीस पत्नी

..........................

Web Title: Police life ... 24 hours on duty, no attention to family, no attention to nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस