‘त्या’ तपासी अधिकाऱ्याची मुख्यालयात रवानगी
By Admin | Published: June 6, 2017 01:10 AM2017-06-06T01:10:29+5:302017-06-06T01:10:29+5:30
तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा केला होता.
आरोपीला सोडणे भोवले : रेती भरलेला ट्रक सोडल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू: तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा केला होता. यावेळी तपासी अधिकाऱ्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमताने चिरीमिरी घेत तो सोडला. शिवाय घाट मालकालाही अभय दिले. या प्रकरणाचा ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकरण दडपणाऱ्या तपासी अधिकाऱ्याची रवानगी मुख्यालयात केली आहे. शिवाय या घाटमालकाला अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
अटकेच्या आदेशाची कल्पना मिळताच आरोपीने अटकपूर्ण जामीनाचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयाने त्यावर निर्णय राखून ठेवत येत्या बुधवारी (दि. ७ जून) रोजी सुनावणी ठेवली आहे. आरोपीचा जामीन मंजूर होतो की नाही याची उत्स्कुता सर्वांना लागून आहे.
प्रकरणाच्या तपासी अधिकारी शुभांगी ताकीत यांनी आरोपीला अभय दिल्याचे एसपी निर्मलादेवी एस. यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीच्या अटकेचे आदेश तर दिलेच मात्र दोषी तपासी अधिकाऱ्यावरही तात्काळ कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात काही प्रमाणात का होईना शिस्त लागेल, असे बोलले जात आहे. आता सर्वांच्या नजरा मुख्या आरोच्या अटकेकडे लागल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून या प्रकरणाच्या तपासी अधिकारी शुभांगी ताकीत यांच्याकडील तपासाची सर्व कागरत्रे घेवून सोमवारी रात्री ८ वाजेनंतर त्यांचा कार्यभार काढून त्यांना मुख्यालयी पाठविण्यात येईल.
- विलास काळे, ठाणेदार (प्रभारी), पोलीस स्टेशन, सेलू