वर्धेत ऐनवेळी पोलीस पाटलांच्या मुलाखती रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:14 AM2018-04-07T00:14:22+5:302018-04-07T00:14:22+5:30
जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र वर्धेत ऐन वेळेवर मुलाखती रद्द करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ माजला. तर हिंगणघाट येथेही मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या.
वर्धेत होणाऱ्या मुलाखती पारदर्शक व्हाव्या, यात कुण्या दलालाचा हस्तक्षेप होवू नये असे म्हणत या मुलाखती वेळेवर रद्द करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तर हिंगणघाट उपविभागात आजंती येथील पोटनिवडणूक असल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळेवर मुलाखती रद्दचा निर्णय घेण्यात आल्याने मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. वर्धा आणि हिंगणघाट उपविभागात या मुलाखती आता ९ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
निर्धारित वेळेनुसार आज वर्धा उपविभागात मुलाखत असल्याने वर्धा विभागातील १७५ विद्यार्थी सकाळीच हजर झाले. वर्धेत एकूण १९० जागा असून याकरिता ७७७ उमेदवार पात्र ठरले आहे. त्यांच्या मुलाखती आजपासून होणार होत्या. मात्र उपविभागीय कार्यालयातील आदेश पाहताच उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक महिला तर आपल्या चिमुकल्यांना घेऊन रखरखत्या उन्हात आल्या होत्या. ऐन वेळेवर मुलाखत रद्द झाल्याचे कळताच त्यांची चांगलीच निराशा झाली आणि त्यांना परत जावे लागले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला.
याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी पारदर्शक प्रक्रिया पार पडावी व कोणताच राजकीय हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने मुलाखती पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगितले. सोबतच एमपीएससी पॅटर्ननुसार मुलाखत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वर्धेत होणार टोकन पद्धतीतून मुलाखती
वर्धेत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मुलाखती टोकन पद्धतीने होणार आहे. यात मुलाखत घेणाºयाला उमेदवाराचे नाव माहीत राहणार नाही. यामुळे घोळ होण्याची शक्यता राहणार नाही. घेतलेला निर्णय पारदर्शक पद्धतीने मुलाखती होण्याकरिता योग्य असला तरी वेळेवर प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांची झाली. उमेदवारांना याची पूर्वसूचना दिली असती तर हा प्रकार घडला नसता. यामुळे मुलाखतीकरिता आलेल्यांची तारांबळ उडाली.
आर्वीत झाल्या मुलाखती
शासनाच्या कार्यक्रमानुसार ६ एप्रिलपासून मुलाखती होणार होत्या. त्यानुसार आज आर्वी येथे मुलाखती पार पडल्या. येथे १३० जागांकरिता मुलाखती होत आहे. यात ५४७ उमेदवारांच्या मुलाखती होत आहे. आज पहिल्या दिवशी ९४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.