पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:55 AM2019-06-10T01:55:58+5:302019-06-10T01:56:16+5:30

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली.

Police patronize liquor liquor? | पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

Next
ठळक मुद्देनागरिक, दारूविक्रेत्यांचा आरोप : बंदीची शक्यता धूसरच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र नंतर हा व्यवसाय चांगलाच फोफावला. वर्धा शहरातील जिल्ह्यातील २ हजारावर तरुण, महिला आणि नागरिकांचे हात या व्यवसायात गुंतले आहेत. एकट्या वर्धा शहरात दारूचे हजारावर अड्डे आहेत.
शास्त्री चौक परिसर, इंदिरानगर, कृष्णनगर, इतवारा, सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (निपाणी), महादेवपुरा, कानगाव, अल्लीपूर, धोत्रा यासह अन्य परिसरात परमिट रूमप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे सर्वच अवैध बार कित्येक वर्षांपासून राजसरोसपणे सुरू आहेत. येथील परिस्थिती पाहिल्यावर जिल्ह्यात दारूबंदी आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. महिन्याकाठी आम्ही पोलिसांना मोठी देण देतो, या जोरावरच आमचे व्यवसाय बिनदिक्कतपणे चालतात, असे दारूविक्रेत्यांच्या गोटातूनच बोलले जाते. या बारशिवाय शहरातील बॅचलर रोड, आर्वी रोड, बसस्थानक रोड, रेल्वेस्थानक मार्गावरील पानठेले आणि खाणावळींमध्ये दारू रिचविण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे सायंकाळनंतर दारूरंगी रंगणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नागपूर मार्गालगतचे अनेक हॉटेल्सनीही गार्डन बारचे रूप धारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे मद्य रिचविणाऱ्यांची गर्दी असते.
दारूविक्री आणि रिचविण्याची ठिकाणे ठाऊक आहेत. मात्र, कारवाई केली जात नाही. महामार्गावर अन्य ठिकाणी कार-दुचाकीसह दारूसाठा जप्त करून कारवाईचा देखावा केला जातो. यामुळे हा व्यवसाय मोठे जाळे विणताना दिसत आहे. वर्ध्यात दररोज एसटी, आलिशान गाडी, रेल्वेगाड्या आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूसाठा दाखल होतो. मात्र यात केवळ ‘अर्थ’कारण दडले असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कुठेही दारू‘बंदी’च मिळते. पोलिसांची काही पथके दुचाकीने रात्री गस्त घालताना दिसतात, ती केवळ वसुलीसाठी, असेही अनेक वॉर्डांतील नागरिकांनी लोकमतला सांगितले.
शहरालगतच्या पारधी बेड्यांवर संबंधित पोलीस ठाण्याकडून नित्याने वॉश आउट मोहीम राबविली जाते. मात्र, ठोस कारवाईच होत नसल्याने हे धंदे पुन्हा ‘जैसे थे’ सुरू होतात. पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी लोखंडी ड्रमच्या मोठ्या संख्येसोबत फोटो सेशन करून नामानिराळे होतात.
पोलिसांचेच अभय असल्याने जिल्ह्यात दारूबंदी धूसरच असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी धडक मोहीम राबवून या अवैध व्यवसायाला पायबंद घालावा, अी मागणी जनमानसातून होत आहे.
व्यक्तिगत वसुली
शहर व रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकातील अनेक कर्मचारी सायंकाळनंतर शहरातील विविध दारू गुत्थ्यांवर व्यक्तिगत वसुली करताना दिसतात. इंदिरानगर, कृष्णनगर आदी भागात दररोजच पोलीस दोन-दोनच्या जोडीने येऊन पैसे घेऊन जातात, असे त्या-त्या परिसरातीलच नागरिकांनी सांगितले.

Web Title: Police patronize liquor liquor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.