पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:02 AM2018-01-12T00:02:30+5:302018-01-12T00:02:50+5:30
येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
वायगाव (नि.) पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्या गावांची एकूण लोकसंख्या ३५ ते ४० हजाराच्या घरात आहे. परंतु, ज्या पोलीस कचेरीच्या खांद्यावर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच पोलीस कचेरीत कर्मचाºयांचा वानवा आहे. या पोलीस चौकीत केवळ चार कर्मचारी व एक अधिकारी असे एकूण पाच पोलीस नेमण्यात आले आहे. मात्र, तेही या पोलीस चौकीत नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसी मदत मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांना वेळोवेळी विविध कामानिमित्त देवळी येथे पाचारण करण्यात येत असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात.
या गावातून चंद्रपूर, पाढंरकवडा, यवतमाळ कडे जाणारा महामार्ग गेला आहे. या गावातील भुतडा हत्याकांड प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, सध्या दररोज पोलीस गस्तही घालत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे तक्रारकर्त्याला बहूदा देवळी पोलीस ठाणे गाठून पोलीस कचेरीत तक्रार नोंदवून घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपुऱ्या पोलिसांमुळे परिसरात दारूविक्री, सट्टापट्टी आदी व्यवसाय पायमुळ घट्ट करू पाहत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.
चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश
येथील पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात आहे. येथे झालेल्या लोकसहभागाच्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करीत संबंधितांना गौरविले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सुरू राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिकारी बदलताच चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.