पोलिसदादाने वाचविला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:31 PM2019-07-26T23:31:52+5:302019-07-26T23:32:10+5:30
तापाने फणफणत असलेल्या अनोळखी व्यक्तीला पोलीस शिपायाने मध्यरात्री कोणतेही वाहन नसताना प्रयत्नांची पराकाष्टा करून ३० किलोमीटरच्या अंतरावरील दवाखान्यात दाखल केले. शिपायामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : तापाने फणफणत असलेल्या अनोळखी व्यक्तीला पोलीस शिपायाने मध्यरात्री कोणतेही वाहन नसताना प्रयत्नांची पराकाष्टा करून ३० किलोमीटरच्या अंतरावरील दवाखान्यात दाखल केले. शिपायामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
चिचोली येथील पोलीस पाटील लोमेश्वर मानकर यांनी बिट जमादार कैलास माहुरे यांना एक संशयास्पद व्यक्ती गावात फिरत असल्याची माहिती दिली. त्यामुळे लगेच जमादार कैलास माहुरे, कैलास चौबे, अमोल मानमोडे, मनोज आसोले हे चिंचोलीला गेले. त्यांना त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा मधुकर भुयार रा. भिष्णूर असे त्याचे नाव असून तो वेडसर असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे त्याला पोलीस पाटलाच्या स्वाधिन करून पोलीस कर्मचारी परत निघाले. रस्त्याने येत असताना किन्हाळा-खडकी मार्गावर एक व्यक्ती निपचित पडून दिसला. पोलिसांनी आपले वाहन थांबवून त्याची ओळख पटविण्याकरिता चिंचोलीचे पोलीस पाटील अतुल झटाले, पंकज परतेकी व किन्हाळा येथील मंगेश धुर्वे यांना बोलावून घेतले. तेव्हा तो व्यक्ती उत्तम वानखेडे असल्याचे सांगण्यात आले.
अंगात ताप असल्याने पोलिसांनी १०८ वर फोन करून माहिती दिली. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी लगेच तळेगावात आणल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. या रुग्णवाहिकेतून त्या व्यक्तीला आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळीच पोलीस धाऊन आल्यामुळे उत्तम वानखेडे यांचा जीव वाचला.