अॅफकॉनच्या विरोधात तक्रार देणाऱ्याना पोलिसांची दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 05:00 AM2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:18+5:30
अॅफकॉन्स कंपनीची मोठमोठी वाहने या परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील धुळ नजिकच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके खराब झाली आहेत. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते जुमानत नाही उलट कंपनीचे अधिकारी पोलीसांकरवी शेतकऱ्यांनाच हे सरकारी काम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : सोरटा-विरूळ भागात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अॅफकॉन्स कंपनीची मोठमोठी वाहने या परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील धुळ नजिकच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके खराब झाली आहेत. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास ते जुमानत नाही उलट कंपनीचे अधिकारी पोलीसांकरवी शेतकऱ्यांनाच हे सरकारी काम आहे. याला विरोध तर खबरदार अशी दमदाटी करतात. विरूळ परिसरातून या कामासाठी लागणारा मुरूम व इतर साहित्य गोळा करण्यासाठी अॅफकॉन्स कंपनीची मोठ-मोठी जड वाहणे परिसरातील विरूळ, सोरटा, रसुलाबाद, पिंपळगाव, निजामपूर, टाकळी, मारडा , सालफळ या गाव परिसरातील रस्त्यावरून दिवसरात्र फिरत असतात. या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची तर वाट लागलीच पण रस्ता लगतची अनेक शेतकऱ्यांची उभ्या पिकांवर धुळीचे कण साचून पिके कोमजली व पिकांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया थांबुन पिके खराब झाली. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यंदा निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतमाल उत्पन्नात घट आली असून त्या संकटात अॅफकॉन्स कंपनीच्या मनमानी कारभाराने शेतकºयांच्या नुकसानीत भर टाकली आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवर दिवसाला दोन वेळा पाणी मारून उडणारी धुळ कमी करण्याची विनंती केली असता ते याकडे दुर्लक्ष करतात. यापूर्वी सुध्दा या भागात कंपनीच्यावतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अवैध उत्खन्न करण्यात आले त्यांच्या संदर्भात पोलिसात तक्रारी दिल्या पण पोलिसांनी कारवाई केली नाही.
सरकारी कामात अडथळा आणू नका
शेतकऱ्यांनी याबाबत कंपनीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असता पोलीस देखील कंपनीचीच बाजू घेवून हे सरकारी काम काम आहे. यात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करू अशी शेतकऱ्यांनाच दमदाटी करतात. कंपनीचे अधिकारी व पोलीसांच्या दमदाटीला शेतकरी कंटाळले असून माजी जि.प.सदस्य गजानन निकम यांच्या नेतृत्वात कंपनीविरूध्द लढा दिला जाणार आहे, अशी माहिती शेतकºयांनी दिली.