पोलिसांच्या धाडसत्रात लाखावर दारुसाठा जप्त
By admin | Published: October 6, 2014 11:17 PM2014-10-06T23:17:40+5:302014-10-06T23:17:40+5:30
विधानसभेची निवडणूक पाहता पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर धाड टाकुन केलेल्या कारवाईत गावठी दारूसाठा,
समुद्रपूर : विधानसभेची निवडणूक पाहता पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर धाड टाकुन केलेल्या कारवाईत गावठी दारूसाठा, सडव्यासह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. जगदीश नत्थू वादाफळे (४५) रा. खुणी, शीला राजू काळे (३२) रा. शिवणी, अन्तोसनी नानचंद काळे (४५) रा. शिवणी बेडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिवणी येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात दारूचा गाळप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक माहूरकर, राहुल जंजाळ व रूपचंद भगत यांच्या नेतृत्त्वात तुकड्या तयार केल्या. गावाबाहेर दारुचा गाळप सुरु असलेल्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात ५३ हजार २०० व ३३ हजार आणि ३३ हजार ६०० रुपयाचे दारुचे साहित्य, सडवा, मोहा, प्लास्टिक व लोखंडी ड्रम असा एकूण १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. निवडणुकीच्या काळात दारुची अवैध वाहतूक केली जाते. या प्रकाराला आळा घालण्याकरिता पोलिसांचे धाडसत्र सुरुअ आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)