पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच
By admin | Published: September 16, 2015 02:49 AM2015-09-16T02:49:04+5:302015-09-16T02:49:04+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला.
लोकप्रतिनिधींची उदासीनता : बांधकामाची फाईल धूळ खात पडून
अनिल रिठे तळेगाव(श्या.पंत)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. जागा कमी पडत असल्याने तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी अमरावती रोडवरील शासनाची जागा पोलीस स्टेशनसाठी मंजूर करून आणली. जमीन असल्यामुळे पोलीस ठाण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला. बांधकामाची फाईल पुढे पाठविण्यात आली. मात्र यात असंख्य चुका असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. परिणामी ती धुळखात पडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे.
दोन वर्षापूर्वी तळेगाव पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले. सुरूवातीला काही दिवस व्यवस्थित कारभार सुरू राहिला. काही दिवसांनी मात्र कर्मचारी वाढल्याने कुणाला कोठे बसवावे, असा प्रश्न उभा ठाकला. यात महिला कर्मचारी वर्गाची जास्त कुचंबना होत आहे. अपघातग्रस्त वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने कोठे ठेवावी, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी ध्वजारोहणानंतर परेड कोठे घ्यावी, असाही प्रश्न पडतो.
वरिष्ठ अधिकारी ठाण्याची पाहणी करण्याकरिता आल्यावर नियमानुसार त्यांना मानवंदना द्यावी लागते. ती देण्याकरिता येथे जागा नाही. ठाण्याचा आवारात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतत्र कक्ष नाही. स्वच्छतागृहही नाही. एवढेच काय या ठाण्याच्या इमारतीला कुंपणही घालण्यात आलेले नाही. त्यामुळे मोकाट प्राणी बिनधास्तपणे ठाण्याच्या आवारात संचार करीत असतात. मोठ्या कारवाईचे दस्तावेज तयार करावयाचे झाल्यास ते कोठे बसून तयार करावे, हा प्रश्न पडतो. एखाद्या गुन्ह्यातील ४ ते ५ साक्षीदार एकाचवेळी साक्ष नोंदवायला आले तर त्यांना कोठे बसवायचे व कर्मचाऱ्यांनी कोठे बसायचे हे देखील कळत नाही. पोलीस ठाण्याकरिता आर्वी मार्गावर जामनेर शिवारात १९९० मध्ये जागा दिल्या गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशन मंजूर व्हायचे होते.
पोलीस स्टेशन मंजूर झाल्यावर अमरावती मार्गावर जागेची पाहणी करण्यात आली. जागेच्या दस्तऐवजाच्या फाईलमध्ये जुनी फाईलही होती. पण आती ती कोठे धुळखात पडली आहे हे सांगण्यास अधिकारी तयार नाही. केवळ निधी देवून जबाबदारी पूर्ण झाल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जागेच्या फाईलकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे.
येथील पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. मात्र समस्यांना पाढा आ वासून उभा आहे. जागा कमी आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असा प्रकार झाला आहे. कारवाई मध्ये व अपघातात जप्त केलेली वाहने कोणाच्याही दुकानासमोर लावली जातात. यात ती पुन्हा चोरीस जाण्याचा धोका वाढला आहे.