वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:26 AM2017-11-13T11:26:15+5:302017-11-13T12:42:17+5:30

वर्धेत गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

Police threatens spy man in Wardha | वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देशहर पोलीस आणि एलसीबीत तपासावरून छुपा वादश्रेय लाटण्यासाठी सुरू आहे धडपड

आॅनलाईन लोकमत
वर्धा : कोणताही गुन्हा शोधण्याकरिता पोलिसांचा महत्त्वाचा दुवा खबरी असतो. या खबऱ्यांच्या माध्यमातूनच पोलिसांना माहिती मिळून मोठमोठे आरोपी पकडल्याचा इतिहास आहे. वर्धेत मात्र गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून खबऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार होत असेल तर गुन्हेगारांची माहिती देण्यास कोण समोर येईल, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. केवळ खात्याचा रिवार्ड आणि अधिकाऱ्यांकडून पाठीवर थाप याकरिता हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.
खबरे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख मिळवून आहेत. त्यांच्याच आधारावर पोलिसांचे बरेचशे तपास लागतात. यामुळे गुन्हे अन्वेषणाच्या कामात त्यांना विशेष महत्त्व आहे. याच खबºयांच्या आधारावर वर्धेत गत आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्या प्रकरणाचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शक्य झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही कारवाई शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना खटकली. शहर ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी पकडणे शहर पोलिसांना जमले नाही, असे ताशेरे वरिष्ठांनी त्यांच्यावर ओढल्याची माहिती आहे. यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती पुरविणाऱ्या त्या खबऱ्यांचा शोध घेतला.
हा शोध घेताना या पोलिसांकडून खबरी असलेल्या व काही नसलेल्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. कधी काही अवैध कामे करणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांचा हा रोष कायमच असताना पोलिसांच्या हाती दुसरा आरोपी आला. पण शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आरोपीला ओळखणे शक्य झाले नाही. यामुळे तो त्यांच्या हाती असतानाही त्यांना गवसला नाही. परिणामी काल रात्री या भागातील नागरिकांनी स्वत: त्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणत ठाणेदाराच्या स्वाधीन केले.
आरोपीच्या शोधाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शहर ठाण्याच्या पोलिसात असा छुपा वाद असल्याचे या प्रकरणातून उघड झाले. हा वाद आजचा नाही तर यापूर्वीही होता. पण तो उघड झाला नव्हता. या प्रकरणात हा प्रकार उघड झाला. यावर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांकडून असेच प्रकार घडत असल्यास पुढे येवून कोणीच माहिती देणार नाही.
लोकाभिमुख सेवेला छेदाची शक्यता
च्पोलीस विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर शासनाच्यावतीने गृह खाते भर देत आहे. परंतु पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीत काहीच बदल झाला नसल्याची अनेक प्रकरणे आहेत. आता तर केवळ अधिकाऱ्यांची मर्जी राखण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांकडून खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारातून प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या प्रकाराला छेद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोष टाळण्याकरिता नागरिकांनीच केला आरोपी स्वाधीन
च्जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्याकांडातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केला. दुसरा आरोपी शहर पोलिसांच्या नजरेत असताना त्याला त्यांनी अटक केली नाही. केवळ चौकशी करून सोडले. मात्र दुसरा आरोपी तोच असल्याने या भागातील नागरिकांनी पोलिसांना प्रकरणाची माहिती देवून रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या आरोपीला शहर ठाण्यात आणून ठाणेदाराच्या स्वाधीन केल्याचा प्रकार घडला.

Web Title: Police threatens spy man in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा