महिलांच्या तक्रारीनंतर आली पोलिसांना जाग
By admin | Published: June 14, 2017 12:52 AM2017-06-14T00:52:13+5:302017-06-14T00:52:13+5:30
वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत जांगापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर ठेला लावून दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता.
राष्ट्रीय महामार्गावरील ठेला हटविला : दारूविक्रीचा होता ग्रामस्थांना त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत जांगापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर ठेला लावून दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत होतो. यामुळे संतप्त महिलांनी पोलीस ठाणे गाठत तात्काळ कारवाईची मागणी केली. यावरून ठाणेदार गजानन वासेकर यांनी कर्मचारी पाठवून सदर ठेला हटविला.
जांगापूर येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील टपरीवर दारूविक्रीचा व्यवसाय चालत होता. सदर चहाटपरी बाबुसिंग जुनी याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत होते. दारूविक्रीच्या व्यवसायाचा गावातील महिलांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी, महिलांनी एकत्र येत मंगळवारी वडनेर पोलीस ठाणे गाठत ठाणेदार वासेकर यांना त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. महिलांच्या तक्रारीवरून ठाणेदार वासेकर यांनी लगेच पोलीस कर्मचारी पाठवून महिलांसमक्ष ठेला हटविला. निवेदन देताना अरुणा राऊत, करुणा पोहणकर, संगीता वांढरे, कांचनबाला घोरपडे, संगीता मरस्कोल्हे आदी उपस्थित होत्या.
राष्ट्रीय महामार्गावरील टपरीत दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची तक्रार प्राप्त झाली. यावरून टपरी हटविली आहे. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेहमीच सहकार्य राहिल. नागरिकांनी काही अडचणी असल्यास तक्रारी कराव्यात.
- गजानन वासेकर, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वडनेर.