‘ऑन ड्यूटी’ हृदयविकाराचा झटका; पोलीस अंमलदाराचा मृत्यू
By चैतन्य जोशी | Published: September 12, 2022 02:05 PM2022-09-12T14:05:03+5:302022-09-12T14:12:01+5:30
मृत्यूने पोलीस विभाग शोकाकुल : रामनगर ठाण्यात होते कार्यरत
वर्धा : शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामहरी दिनकर शिरसाठ (३३) रा. तेलघाना ता. अंबेजोगाई जि. बीड यांना कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा १२ रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच पोलीस विभागात शोकाकुल वातावरण होते.
पोलीस अंमलदार ब. नं. ८४७ रामहरी दिनकर शिरसाठ यांची २०१० मध्ये पाेलीस दलात नियुक्ती झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध पोलीस ठाण्यांत कर्तव्य बजावले. सध्या ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते डायल ११२ या अत्याधुनिक वाहनातून गस्त घालीत असतानाच त्यांना ११ रोजी मध्यरात्री अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आराम करण्यासाठी काही वेळासाठी घरी गेले. घरी आराम करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, १५ महिन्यांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी असे ते वर्ध्यातील घरी राहत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता माहिती होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. रामहरी शिरसाठ यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पोलीस वाहनात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी झाल्यावर त्यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयात नेण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला पोलीस सलामी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळ गावी तेलघाना जि. बीड येथे नेण्यात आला.