९० टक्के बालकांना पोलिओ डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:32 PM2018-03-11T22:32:08+5:302018-03-11T22:32:08+5:30
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसरी फेरीचा श्रीगणेशा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसरी फेरीचा श्रीगणेशा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख १४ हजार ६ बालकांपैकी ९० टक्के बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, नेत्र तज्ज्ञ डॉ. मोहन सुटे, डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षदीप पारेकर, डॉ. विनीत झलके, प्रभाकर पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस पाजून सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. देशामध्ये १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. सन २०१७-१८ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी रविवार ११ मार्चला राबविण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. रविवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ५ वर्षाआतील जिल्ह्यातील एकूण १ लाख १४ हजार ६ बालकांना सदर लस पाजण्याचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ९० टक्के बालकांना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओची लस पाजण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सामाजिक संस्था व संघटना आल्या पुढे
जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १,१४,००६ बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी व सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, आयसीडीएस विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, आय.एम.ए., जिल्हा होमगार्डस, स्काऊटस्-गाईडस्, जिल्ह्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये, दुरदर्शन, केबल टिव्ही नेटवर्क, याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांचे योगदान लाभल्याचे सांगण्यात आले.
१ हजार ३४० केंद्र
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात १ हजार ३४० लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागासाठी १ हजार १३९ तर शहरी क्षेत्रासाठी २०१ केंद्रांचा समावेश होता. सदर मोहिमेत एकुण ३ हजार २६० कर्मचारी व २६९ पर्यवेक्षक कार्यरत होते. शिवाय टोल नाके, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८६ ट्रान्झीट टिम्स सज्ज करण्यात आल्या होत्या. ९३ मोबाईल टिम्सद्वारे वीट भट्या, ऊस तोडणारे कामगार आदी भटक्या कुटुंबातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली.
५८ गावांतील २,९१० बालकांना लस
मांडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५८ गावामध्ये पल्स पोलिओ मोहिमेच्या दुसºया फेरीचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता सोनकुसरे, जिल्हा पर्यवेक्षक बाबाराव कनेर, आरोग्य सहाय्यक अशोक भुजाडे, ढगे यांची उपस्थिती होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८ उपकेंद्रातील ५८ गावामध्ये ६४ बुथ व आठ फिरत्या पथकाद्वार २,९१० बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. बस स्थानक, यात्रेचे ठिकाण व वर्दळीच्या ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. मोहिमेला १४० कर्मचारी १२ पर्यवेक्षकांनी सहकार्य केले. यावेळी एकनाथ देवढे, प्रशिल माटे, तुषार मिरगे, दिलीप पोहनकार, राजेश भोंगाडे, श्याम गोवर्धन, संदीप टेंभरे, संदीप नारीकर, कुंटे, गिरीश कोटंबकार, नरेश शंभरकर, पुष्पा पडोळे, दिक्षा अलोने आदींची उपस्थिती होती.